पुण्यात रंगणार ग्रिप्स नाट्य महोत्सव

पुणे : कला आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या तसेच रंगभूमी विषयी प्रेम असणाऱ्या पुणे शहरात यंदा ‘ग्रिप्स नाट्य महोत्सव’ रंगणार आहे. रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया अॅक्टीव्हीटी रिसर्च अँड टेक्नोलॉजी अर्थात स्मार्ट या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते २२ मे दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या कर्वेनगर येथील आवारात हा महोत्सव होणार असून ६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींना यात सहभागी होता येईल.

रेनबो अम्ब्रेला फाउंडेशनचे श्रीरंग गोडबोले यांनी आज शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत या महोत्सवाची घोषणा केली. यावेळी अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका विभावरी देशपांडे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया अॅक्टीव्हीटी रिसर्च अँड टेक्नोलॉजी अर्थात स्मार्ट या संस्थेच्या संचालिका राधिका इंगळे आणि रेनबो अम्ब्रेला फाउंडेशनचे हृषीकेश देशपांडे यावेळी उपस्थित होते..

जर्मनीतील बर्लिन येथील ग्रिप्स थिएटर ही लहान मुले व तरुणांसाठी काम करणारी मुक्त रंगभूमी म्हणून ओळखली जाते. लहान मुले व किशोरवयीन मुलांची जडणघडण व राहणीमान यावर सामाजिकदृष्ट्या प्रकाश टाकणारी ही जगभरातील पहिली नाट्यसंस्था असून त्यांनी विनोदी आणि संगीत नाटक या माध्यमातून संबंधित विषयांवर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. जगभरातील सुमारे ४० भाषांमध्ये १५०० हून अधिक वेळा ग्रिप्स नाटकांचे पुनर्प्रयोग झाले आहेत.

१९८६ मध्ये डॉ. मोहन आगाशे यांनी ग्रिप्स थिएटरची संकल्पना भारतात विशेषतः पुणे शहरात आणली . त्यानंतर श्रीरंग गोडबोले, विभावरी व हृषीकेश देशपांडे, राधिका इंगळे या कलाकारांनी इतर कलाकरांच्या साथीने ही संकल्पना पुण्यात रुजवली. ग्रिप्स थिएटरला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जर्मनीत आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात पुण्यात झालेल्या या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. जर्मनीबाहेरील इतर भाषेत ग्रिप्स थिएटरची परंपरा सुरू करून ती अविरत सुरू ठेवण्याच्या पुण्यातील यशस्वी प्रयत्नांचे कौतूक यावेळी करण्यात आले होते.

या नाट्य महोत्सवाविषयी माहिती देताना श्रीरंग गोडबोले म्हणाले, “ग्रिप्स थिएटरच्या संकल्पनेवर तयार झालेली प्रसिद्ध अशी ४ मराठी नाटके महोत्सवादरम्यान सादर केली जाणार आहेत. महोत्सवादरम्यान प्रत्येक नाटकाचे ४ प्रयोग होणार आहेत जेणेकरून अधिकाधिक मुलांना या नाटकांचा आनंद घेता येईल.” या महोत्सवामध्ये श्रीरंग गोडबोले यांनी १९८६ मध्ये जर्मन लेखकासोबत सहलेखन आणि सहदिग्दर्शन केलेले नाटक ‘छान छोटे, वाईट्ट मोठे’ या नाटकाचा समावेश आहे. या नाटकाचे संगीत दिग्दर्शन राहूल रानडे यांनी केले होते. खरंतर या नाटकापासून भारतात ग्रिप्स थिएटरची सुरुवात झाली. यंदाच्या महोत्सवात सादर होणाऱ्या या नाटकाचे दिग्दर्शन उदयोन्मुख दिग्दर्शक संकेत पारखे करणार आहेत.

पुण्यातील ग्रिप्स थिएटरचा भाग असणारे दुसरे नाटक म्हणजे ‘नको रे बाबा’. हे नाटक कुटुंबातील स्त्रियांचे स्थान या विषयावर आधारित असून १९८९ साली पहिल्यांदा हे नाटक रंगभूमीवर आले होते. श्रीरंग गोडबोले लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाच्या महोत्सवात सादर होणाऱ्या प्रयोगाची जबाबदारी पौर्णिमा मनोहर या दिग्दर्शिका पार पाडणार आहेत.

ग्रिप्स नाटकांविषयी सांगताना विभावरी देशपांडे म्हणाल्या, “माझी दोन नाटके या महोत्सवामध्ये सादर केली जाणार आहेत. यातील पहिले नाटक म्हणजे ‘प्रोजेक्ट अदिती’. हे नाटक पालकांच्या मुलांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा आणि स्पर्धेच्या जगात मुलांची होणारी परवड यावर आधारित आहे. तर बाल लैंगिक शोषण या विषयावर प्रकाश टाकणारे ‘एकदा काय झाले’ हे दुसरे नाटक देखील महोत्सवाचा भाग असेल.”

पुण्यातील बहुतांश ग्रिप्स थिएटर नाटकांची निर्मिती थिएटर अॅकॅडमी आणि त्यानंतर महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या माध्यमातून झाली असून ‘प्रोजेक्ट अदिती’चा पहिला प्रयोग २०१० मध्ये तर ‘एकदा काय झाले’चा प्रथम प्रयोग २०१७ मध्ये करण्यात आला, असे विभावरी देशपांडे यांनी सांगितले. देशपांडे यांचा ग्रिप्ससोबतचा प्रवास शाळेत असताना प्रेक्षक म्हणून सुरु झाला त्यानंर तो अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या जवाबदाऱ्या  सांभाळत पुढे गेला.

महोत्सवादरम्यान होणाऱ्या इतर उपक्रमांबद्दल माहिती देताना राधिका इंगळे म्हणाल्या, “कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये हे सर्व उपक्रम होणार आहेत. संस्थेच्या आवारातील राम पुरुषोत्तम संकुलात दररोज सायंकाळी ७ ते रात्री ८.३० या वेळेत ग्रिप्स नाट्य महोत्सवातील नाटके सादर केली जातील. तर ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी नाटकांव्यतिरिक्त इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अभिनय, नृत्य, कठपुतळी / बोलक्या बाहुल्या आणि चित्रपट निर्मिती या विषयांवर कार्यशाळा होणार असून दुपारी ३ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत या कार्यशाळा घेण्यात येतील.”

“त्यानंतर संध्याकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत मनोरंजन आणि करमणुकीचे उपक्रम होतील. तसेच सामान्यांना माहिती नसलेल्या मात्र महत्त्वाच्या असलेल्या पुण्यातील विविध ठिकाणी हेरिटेज वॉक उपक्रम या महोत्सवाचा एक महत्वाचा घटक असेल. डॉ. अनिल अवचट यांनी लिहिलेल्या पुण्याची अपूर्वाई या पुस्तकावर आधारित हे हेरिटेज वॉक असणार आहेत. एकूणच यंदाच्या उन्हाळ्यात मुलांसाठी हा नावीन्यपूर्ण आणि परिपूर्ण असा अनुभव असेल,” असेही त्या म्हणाल्या.

रेनबो फाउंडेशनच्या उद्दिष्टांविषयी माहिती देताना श्रीरंग गोडबोले म्हणाले, “मनोरंजनाच्या माध्यमातून मूल्यशिक्षण देण्याच्या उद्देशाने प्रिंट, टेलिव्हिजन, थिएटर अशा विविध माध्यमातून मुलांसाठी साहित्य निर्माण करण्याच्या क्षेत्रात आम्ही काम करीत आहोत. आता या संदर्भात नियोजित आणि संरचित परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन सुरू करण्यात आले आहे. ही एक विना नफा तत्वावर काम करणारी संस्था असून याद्वारे सध्याच्या काळाशी सुसंगत असे ऑनलाइन आणि ऑफलाइन उपक्रम तयार करण्यात येणार आहेत. ज्यामुळे मुलांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती, स्वतंत्र भारतात राहण्याचे महत्व, सामाजिक सलोखा, भूतदया यांसारखे गुण विकसित होण्यात मदत होईल.”

Leave a Reply

%d bloggers like this: