श्रीमंत योगी’तून घडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील बालपण ते कर्मयोगी बनण्यापर्यंतचा प्रवास 

पुणे : मुघलांच्या अत्याचाराने बेजार झालेली आणि आपल्या कैवाऱ्याची प्रतीक्षा करत असलेली जनता, छत्रपती शिवजी महाराजांचा जन्म, जिजामाता यांनी लहानपणापासून शिवबाला दिलेले सदाचरणाचे संस्कार, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी घेतलेली स्वराज्याची शपथ, त्यानंतर गनिमी कावा युद्धनीती, पावनखिंड’ची लढाई आणि स्वराज्याच्या स्थापनेनंतर कर्तव्य आणि अध्यात्म या दुविधेत सापडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांनी मार्गदर्शन केल्यावर त्यांचे कर्मयोगी’मध्ये झालेले परिवर्तन, शिवरायांच्या इतिहासातील असे एकाहून एक प्रसंग नृत्याच्या माध्यमातून सादर होत होते. हे सादरीकरण पाहताना प्रेक्षक कधी दुःखी, कधी भावूक, कधी भयभीत, तर कधी आनंदी होत होते. अतिशय समर्पक आणि सक्षमपणे साकारण्यात आलेल्या ‘श्रीमंत योगी’ या नृत्य-नाटिकेने प्रेक्षकांना अंतर्मुख केले.

‘सांख्य डान्स कंपनी’ आणि ‘मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहाव्या ‘सिंधू महोत्सवा’त दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम नृत्यांगना मालविका सरुकाई यांनी विविध नृत्यरचना सादर केल्या, तर सांख्य डान्स कंपनीच्या ग्रुपने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीमंत योगी’ ही नृत्यनाटिका सादर केली.

   यावेळी ‘सांख्य डान्स कंपनी’चे वैभव आरेकर, सहदिग्दर्शक सुशांत जाधव, पुण्यातील मुद्रा नृत्यालयाच्या संस्थापिका पूनम गोखले हे उपस्थित होते.

   गेली ५८ वर्षे अरंगेत्रम आणि नृत्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मालविका सरुकाई यांनी कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सादर केलेल्या तांडवेशा, ‘ललित लवंग’ आणि ‘ठुमक चलत रामचंद्र’ या नृत्य रचनांना प्रेक्षकांनी टाळ्यांचा उदंड प्रतिसाद दिला, तर सत्राच्या शेवटी त्यांनी  वृंदावनी रागातील ‘तिल्लाना’ आणि रविंद्रनाथ टागोर यांच्या ‘वंदे मातरम’ या गीतावर नृत्य सादर केले.

    महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात सादर करण्यात आलेल्या ‘श्रीमंत योगी’ या नृत्य सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाची संकल्पना  वैभव आरेकर यांनी मांडली तर कलात्मक दिग्दर्शन सुशांत जाधव यांनी केले. स्वरदा भावे, इशा पिंगळे, श्रुती रानडे, मृणाल जोशी, आदिती परांजपे, राधिका करंदीकर, अनघा हरकरी, सच्चीदानंद नारायणकर, गौतम मराठे आणि वैभव आरेकर या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला.

Leave a Reply

%d bloggers like this: