स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षापर्यंत भारत जगाचे नेतृत्त्व करू शकतो ः सोनम वांगचूक

पुणे : लोकमान्य टिळकांनी शंभर वर्षांपूर्वी जे सिद्धांत समोर ठेवले होते, तेच आजही तंतोतंत लागू होत आहेत. स्वतंत्र भारताने 75 वर्षामध्ये बर्‍याच गोष्टी साध्य केल्या आहेत. मात्र, अनेक गोष्टी पूर्ण करायच्या राहून गेल्या आहेत, त्या येत्या 25 वर्षांत पूर्ण करणे आवश्यक आहे. तरच, भारत हा जगाचे नेतृत्त्व करू शकतो, असे प्रतिपादन लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी केले. तसेच, देशासाठी जीव नाही, तर जीवन देण्याची आवश्यकता आहे आणि लोकमान्य टिळकांनी संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त सुशीलकुमार शिंदे, खासदार रजनी पाटील, अभिनेते ओमी वैद्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. टिळक स्मारक ट्रस्ट व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, टिमविच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक-मोने, टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रमुख व टिमवि ट्रस्टच्या विश्‍वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक यावेळी उपस्थित होत्या. टिमवि ट्रस्टच्या टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन यावेळी वांगचुक यांच्या हस्ते झाले.


विद्यार्थ्यांमधील निर्मितिशीलतेला प्रोत्साहन देऊन कर्तृत्ववान युवापिढीची केलेली घडण, लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा हिरिरीने पुरस्कार व प्रसार, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात घडवून आणलेले गुणात्मक बदल यासाठी सोनम वांगचुक यांची सन 2020 च्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मात्र, कोरोनामुळे पुरस्कार वितरण सोहळा होऊ शकला नव्हता. मंगळवारी हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
लोकमान्य टिळकांनी सांगितलेल्या राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वदेशी, स्वराज्य या चतुःसूत्रीची कशाप्रकारे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, यावर वांगचुक यांनी भाष्य केले. राष्ट्रीय शिक्षणाबाबत सांगताना ते म्हणाले, लोकांना आवश्यक नसलेले शिक्षण आज सर्वच ठिकाणी देण्यात येत आहे. देशात एकत्मिक शिक्षणाची आवश्यकता नसून, प्रत्येक?भूभागाप्रमाणे आवश्यक असलेले शिक्षण सर्वांपर्यत पोहचवणे गरजेचे?आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठानेदेखील अशाप्रकारे विविध अभ्यासक्रम राबवून आधुनिक शिक्षण सर्वांपर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे. लडाखसारख्या डोंगराळ प्रदेशात आजच्या काळात जे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे, तेच देण्याचे प्रयत्न मागील अनेक वर्षांपासून करत असल्याचेही वांगचुक यांनी सांगितले.
वांगचुक म्हणाले, भारतामध्ये बौद्धिक स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे आपण स्वदेशीला तितके महत्त्व देत नव्हतो. गरज नसतानाही आज आपण चीनकडून अनेक वस्तू विकत घेत आहोत. इतर देशांच्या वस्तूंवर बहिष्कार घालत असताना, त्यांचे उत्पादन भारतामध्ये होण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. लोकसंख्येने कमी असलेले जपान आणि तैवानसारखे देश त्यांची उत्पादने जगभर पोहचवत आहेत. मात्र, आपल्याकडे लोकसंख्या अधिक असूनही आपण जगभरात पूर्ण क्षमतेने पोहचू शकलो नाही. चीनच्या संरक्षण खात्याचे अंदाजपत्रक हे भारतापेक्षा तीनपट जास्त आहे. देशाचा प्रत्येक नागरीक हा सैनिक आहे. चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घातला तर, सैैनिकांना मोठ्या प्रमाणात मदत होईल.
देशाला 75 वर्षांपूर्वी स्वातंत्र मिळाले. त्याचा उत्सवही आपण साजरा केला. मात्र, आपल्याला बौद्धिक स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. देशाला घडवण्यात सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. देशाचा प्रत्येक नागरीक हा उच्चशिक्षित असेल मात्र, देशासाठी एक सैनिक म्हणून त्याची भूमिका समजणे आवश्यक आहे, असेही वांगचूक यांनी सांगितले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, लोकनेतृत्व करणार्‍या शिक्षकाला आपण हा पुरस्कार  दिला आहे. सोनम वांगचुक हे पेशाने अभियंते आहेत. त्यांना मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती. मात्र आपण ज्या भागात वाढलो, मोठे झालो त्या ठिकाणी शैक्षणिक कार्य करण्याची गरज आहे. दुर्लक्षित व डोंगराळ भागात शिक्षणाचे कार्य सुरू केले. या ठिकाणी प्रेरित होऊन शिक्षणाचा यज्ञ त्यांनी सुरु केला. तो सर्व ईशान्य भारतात पसरला पाहिजे. या भागातील मुलांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. ऑक्सिजन व पायाभूत सुविधांची वानवा असलेल्या ठिकाणी त्यांनी काम केले. लोकमान्य टिळकांना स्वदेशी शिक्षणाचा जो पाया घातला तो सोनम यांनी मनापासून स्विकारला.

 

Leave a Reply

%d bloggers like this: