महापालिकेत कचरा घोटाळा करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची  काँग्रेसची मागणी

पुणे : मोटार वाहन विभाग टेंडर क्र. २०९ स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या ठेकेदाराने सन २०१६ ते २०२१ पर्यंत पुणे शहरातील कचरा वाहतुकीचे काम करताना करारातील सर्व महत्वपूर्ण अटी व शर्तींचा भंग करून काम केले. ठेकेदाराने संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यावधी रूपयांची लूट भाजपाशी संबंधित असलेल्या ठेकेदाराने पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीतून केली आहे. इतक्या मोठ्या भ्रष्टाचाराचा २ वर्षापासून पाठपुरावा करून देखील पुणे महानगरपालिकेत सत्तेत असलेले भाजपा या ठेकेदाराला पाठिशी घालण्याचे काम करीत आहे. यामुळे पुणेकरांच्या कररूपी दिलेल्या पैशांचे पर्यायाने पुणे महानगरपालिकेची मोठी फसवणुक झाली आहे. काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट हे या घोटाळ्यासंबंधी मागील २ वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. अनेक पुराव्‍यांसह त्यांनी ६६ वेळा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे पत्र व्‍यवहार केला आहे.

आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिका आयुक्त मा. विक्रम कुमार यांची भेट घेवून निवेदन देवून संबंधित ठेकेदार व त्याला पाठिशी घालणारे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा पुणे शहरातील विविध ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल व न्याय मिळविण्यासाठी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल करण्यात येईल असे कळविले आहे.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, पक्षनेते आबा बागुल, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, कमल व्‍यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे नगरसेवक मनीष आनंद, विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: