कलानिधी आयोजित ‘अस्तित्व’ मैफलीत अनवट सूर-तालांची मिळाली प्रचिती


पुणे : कलाकार आणि श्रोता यांच्यातील अंतर कमी व्हावे, जाणकार श्रोता तयार व्हावा आणि तरुण पिढी शास्त्रीय संगीताकडे आकर्षित व्हावी या उद्देशाने कार्यरत कलानिधीतर्फे ‘अस्तित्व’ या गायन-वादनाच्या कार्यक्रमात निषाद मटंगे, सौरभ काडगांवकर, श्रुती विश्वकर्मा-मराठे, अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, धनंजय हेगडे आणि पंडित रघुनंदन पणशीकर तसेच डॉ. अनिश प्रधान या कलाकारांनी आपली कला सादर करून रसिकांना अनवट सूर-तालाची प्रचिती मिळवून दिली.

एरंडवण्यातील कलमाडी प्रशालेच्या आवारातील शकुंतला शेट्टी सभागृहात आयोजित मैफलीची सुरुवात जयपूर-अत्रौली घराण्याचे वारसदार युवा गायक निषाद मटंगे आणि सौरभ काडगांवकर यांनी गायलेल्या राग बहादुरी तोडीने झाली. ‘पार्वतीपती महादेव..’ आणि ‘पशुपतीनाथ शंकर शंभो’ या रचना बहारदारपणे सादर केल्या.


ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचा मिलाफ असलेल्या धनंजय हेगडे यांनी मियाँ की तोडी रागातील तीन बंदिशी पेश केल्या. विलंबित एकतालातील ‘मेरो मन..’, षड्जचे महत्त्व सांगणारी आधा तीनतालातील ‘षड्ज सूर साधे सबही गावे सबको रिझावे’ ही रचना आणि द्रुत एकतालातील ‘कुतुबुदिल कुतुबालत’चे सादरीकरण रसिकांसाठी पर्वणी ठरले.
पहिल्या सत्राचा समारोप ग्वाल्हेर घराण्याची परंपरा असलेल्या अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांच्या सहगायनाने झाला. बिभास रागातील पारंपरिक ख्याल ‘मोरा रे’ त्याला जोडून द्रुत एकतालातील ‘तारवा गिनत गिनत’ ही बंदिश सादर केली. तसेच पंडित यशवंत महाले यांनी बांधलेला एकतालामधील तराणा पेश केला. अल्हैया बिलावल रागातील एक खयालनुमा पेश करून रसिकांची भरभरून दाद मिळवली. कार्यक्रमाची सांगता ‘जय जय राम’ या झपतालातील रचनेने केली.
दुसर्‍या सत्राची सुरुवात भेंडीबाजार आणि आग्रा घराण्याची तालीम घेतलेल्या युवा पिढीतील आश्वासक गायिका श्रुती विश्वकर्मा-मराठे यांच्या गायनाने झाली. सुरुवातीस मुलतानी रागातील बडा ख्याल पेश करून झुमरा तालातील द्रुत लयीतील ‘मोरे मंदिरवा’ ही रचना सादर केली. पंडित रामाश्रय झा यांची ‘ऐसा तो मोरा सैया’ ही धानी सादर करून गायनाचा समारोप केला.
त्यानंतर आघाडीचे तबलावादक डॉ. अनिश प्रधान यांचे एकल तबला वादन झाले. तीन तालातील वैविध्यपूर्ण वादनाने त्यांनी रसिकांना मोहित केले. जुन्या काळातील प्रसिद्ध तबला वादकांच्या खुबी सांगून त्यांच्या वादनाची झलकही दाखविली. दुसर्‍या सत्राचा आणि कार्यक्रमाचा समारोप  पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने झाला.

Leave a Reply

%d bloggers like this: