‘अनवट शांताबाई’ शब्दमैफिलीस रसिकांची दाद

पुणे : “मी कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे?, त्यांच्याशिवाय कुठे उतरवू, हृदयावरचे अदृश्य ओझे… ” ,’असेन मी नसेन मी ,तरीही असेल गीत हे ‘,अशा शब्दांच्या सोबतीला व्हायोलिनचे आर्त स्वर आणि गडद होत जाणारी संध्याछाया… कातरवेळी दिवंगत ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचे संस्मरणीय व्यक्तिमत्त्व शनिवारी सायंकाळी रसिकांसमोर उभे राहिले.

शांताबाईंच्या अनवट रचनांच्या ‘अनवट शांताबाई’ या शब्दमैफलीने रसिकांना गर्भरेशमी वाङ्मयीन आनंद दिला. . शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून इन्फोसिस फाऊंडेशन, भारतीय विद्या भवन च्या वतीने ‘सांस्कृतिक प्रचार कार्यक्रम ‘ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात कविता, गीत,गद्य वाचनाच्या लयीची जादू रसिकांनी अनुभवली. ‘साहित्यालाच माझ्या जीवनात महत्वाचे स्थान आहे ,साहित्याइतके मला कोणी भारावून गेले नाही ‘,असे मानणाऱ्या कवयित्री शांताबाई शेळके रसिकांना या कार्यक्रमात भारावून अनुभवता आल्या !

डॉ. वंदना बोकील- कुलकर्णी यांच्या संहिता आणि बांधणीतून साकारलेला हा कार्यक्रम त्यांच्यासह प्रेरणा मोहोड,दीपाली दातार आणि अनुराधा जोशी यांनी सादर केला. अनुप कुलथे यांनी व्हायोलिनची सुरेल संगत केली. प्रत्येक रचनेच्या सादरीकरणाला दाद मिळत गेली.भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू ,श्याम भुर्के यांच्यासह अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते.

कवयित्री आणि गीतकार म्हणून मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान असलेल्या शांता शेळके यांच्या ‘वर्षा’, ‘गोंदण’, ‘जन्मजान्हवी’, ‘पूर्वसंध्या’, ‘अनोळख’, ‘इत्यर्थ’ या संग्रहातील कवितांनी कार्यक्रमास रंगत आणली. निवेदनातून शेळके यांच्या गद्यलेखनाची सफर घडली.

‘तोच चंद्रमा नभात’, ‘हात नका लावू माझ्या साडीला’, ‘माझे राणी’, ‘आज चांदणे उन्हात हसले’ आणि ‘ही वाट दूर जाते’ या गीतांच्या तुकड्यांना व्हायोलिनच्या स्वरांनी अधिकच आशयगर्भ करून रसिकांना सुरावटींचा आनंद दिला. ‘

कवितांनी वाढवली रंगत
………………………..
‘धूळपाटी’, ‘संस्मरणे’, ‘जाणता अजाणता’ या त्यांच्या संग्रहातील उतारे आणि त्यांचे सुयोग्य संकलन संपादन कार्यक्रमाला नव्या उंचीवर घेऊन गेले. ‘आजोबा’, ‘मायलेकी’, ‘पैठणी’, ‘अजूनही’, ‘मी चंद्र पाहिला’, ‘पाणी’, ‘लोलक’ या आणि अशा अनेक कवितांनी; तसेच ‘सखुबाई’ व ‘झोपेचा गाव’ या बालकवितांनी ‘अनवट शांताबाई’ या मैफलीची रंगत वाढली.

Leave a Reply

%d bloggers like this: