पुणे विमानतळावरील धक्कादायक प्रकार; सोनं किंवा ड्रग्ज नाहीतर चक्क जिवंत प्रवाळांची तस्करी

पुणे : पुणे विमानतळावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांनी समुद्रातील तब्बल 466 जिवंत प्रवाळ आणल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी दोन प्रवाशांना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी सोने किंवा ड्रग्जची तस्करी केल्याचे अनेक प्रकार पुणे विमानतळावर घडले आहेत. मात्र, जिवंत प्रवाळांच्या तस्करीची ही पहिलीच घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच एप्रिल रोजी दुबईहून एक विमान पुणे विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी नियमितपणे सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मात्र, या दोन प्रवाशांची हालचाल संशयास्पद वाटली. त्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रवाशांची झाडाझडती घेतली असता प्रवाळ आढळून आले. प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणात प्रवाळ आढळून आल्याने अधिकारीही चक्रावले. याधीलकाही प्रवाळ हे काचेच्या भांड्यात तर उर्वरीत प्लास्टिकच्या पिशवीत भरून आणण्यात आले होते. संबंधीत आरोपींना हे प्रवाळ व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणायचे होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे. 

दरम्यान, जप्त केलेले प्रवाळ मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाकडे पुनर्वसनासाठी पाठवण्यात आले आहे. तर ताब्यात घेतलेल्या दोन्ही व्यक्तींच्या विरोधात सीमाशुल्क कायदा व वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली  असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त धनंजय कदम यांनी दिली आहे.

फोटो – प्रातिनिधीक 

Leave a Reply

%d bloggers like this: