“हायजिआ” प्रकल्पाद्वारे सांडपाण्यातून नदीमध्ये जाणार्या कचर्याला प्रतिबंध
पुणे : सांडपाण्यातून नदीमध्ये जाणार्या घनकचर्याला प्रतिबंध करण्यासाठी ट्री इनोव्हेटीव्ह फांउडेशने पुढाकार घेतला आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पूल आणि हडपसरच्या वैदूवाडी झोपडपट्टी परिसरात प्रायोगिक तत्वावर एक प्रकल्प उभारण्यात आला आहे. याप्रकल्पांतर्गत एक महिन्याच्या आत आतापर्यंत २०० किलोहून अधिक घनकचरा नदीमध्ये जाण्यापासून यशस्वीरित्या प्रतिबंधित करण्यात आला. तसेच पावसाळ्यापूर्वी पुणे आणि पिंपरीचिंचवड परिसरातील नद्यांमध्ये सोडल्या जाणार्या ड्रेनेज पाइपलाइनवर हे जाळीदार आवरण वापरण्यात येणार आहे. ज्याद्वारे पावसाळ्याच्या ४ महिन्यांत कमीतकमी ५ टन घनकचरा नदीत जाण्यापासून वाचणार आहे.
दरवर्षी पुण्यामध्ये सखल भागात मुसळधार पावसाने पूर येतो. ड्रेनेजलाईनमधील मोठ्या प्रमाणात साठणार्या घनकचर्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. परिणामी त्यामध्ये गाळ साचून सांडपाणी वाहण्याची क्षमता संपुष्टात येते व पाणी रस्त्यांवर येते. मात्र शहरांमध्ये ड्रेनेजलाईन तुंबून पूर येऊ नये तसेच घनकचरा नदीमध्ये जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी ‘हायजिआ’ प्रकल्प करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन शहर क्विनानाने ड्रेनेज सिस्टीममधून कचर्याचा योग्य निचरा होण्यासाठी एक सोपा आणि किफायतशीर उपाय तयार केला आहे. त्याच धर्तीवर आधारित एक प्रकल्प पुण्यामध्ये करण्यात आला आहे. “हायजिया” प्रकल्पाद्वारे मूळा आणि मुठा नद्यांच्या प्रदुषणावर नियंत्रण आणले जाणार आहे. यासाठी इमरिस आणि पर्सिस्टंट सिस्टीम यांच्या माध्यमातून व पुणे महानगरपालिका आणि वर्टेक्स प्रा. लि.च्या सहकार्याने ट्री इनोव्हेटीव्ह फांउडेशनने पुढाकार घेतला आहे.
ट्री फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक तन्वीर इनामदार म्हणाले की, “हायजिआ” प्रकल्पाचा अभिनव दृष्टीकोन २० ते ३०% घनकचरा नदीत जाण्यापासून प्रतिबंधित करण्याची क्षमता आहे, या उपक्रमांतर्गत पुणे आणि पिंपरीचिंचवड परिसरातील वाहणार्या मुळा मुठेला शुद्ध आणि सुशोभित करण्याचा मानस आहे. फाउंडेशनने गेल्या महिन्यात पुण्यात दोन ठिकाणी हा प्रकल्प सुरु केला होता. तेंव्हापासून नदीमध्ये जाणारा घनकचरा प्रतिबंधीत करता येण्यासाठी “हायजिआ” प्रकल्प यशस्वीरित्या काम करत आहे.
इमरिस इंडीयाचे कार्यकारी संचालक प्रसन्न करंदीकर म्हणाले की, शहरे आणि गावांच्या विकासाला चालना देण्यासाठी जलस्त्रोतांचा सर्वात जास्त वाटा आहे. शहरे जसजशी वाढली आहेत, तसतसे जलस्रोतांवरील प्रदूषणाचा भार अनेक पटींनी वाढला आहे. त्यातच जलस्रोतांची स्वयं-स्वच्छता क्षमता कमी पडत आहे. जलप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नदीमध्ये येणार्या घनकचर्यावर नियंत्रण आणण्यासाठी “हायजिआ” प्रकल्प महत्वपुर्ण आहे.
