भक्तिगीतांनी रंगली संगीत संध्या
पुणे : जगद्गुरू संत तुकारामांचे गणरायाला लवकर येण्याचे आवाहन करणारे भजन ‘गणराया लवकर येई , भेटी सकळांसी देई’….प्रभू श्रीरामांच्या बाललीलांचे वर्णन करणारे ‘ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनियां’ हे संत तुलसीदास लिखित गीत.. संत ज्ञानेश्वरांचे ‘विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले’ अशी गाजलेली भक्तीगीते सादर करीत युवा गायक दत्ताहरी कदम आणि गायत्री येरगुद्दी यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पहिल्या सत्रात दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे आयोजित गीत गायन स्पर्धेतील विजेते युवा गायक दत्ताहरी कदम आणि गायत्री येरगुद्दी यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. तर दुस-या सत्रात झी मराठीवरील कलाकारांनी विशेष कार्यक्रम देखील यावेळी सादर केला.
कवयित्री स्मिता म्हात्रे यांचे गणरायाने एकदा तरी दर्शन द्यावे अशी विनवणी करणारे गीत ‘तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी,सगुण रूप दावी देवा एकदा तरी’…भीमसेन जोशींच्या आवाजाने कानाकोपऱ्यात पोचलेले कन्नड भाषेतील ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या गीताच्या सादरीकरणास उपस्थितांनी विशेष दाद दिली. कृष्णाची बाललीला वर्णनारी संत एकनाथांची गवळण ‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा’ दत्तात्रय कदम यांनी गाऊन कार्यक्रमाचा समारोप केला.
गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत युवा कलाकार व सायंकाळी ७ ते १० यावेळेत दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
