किशोरवयीन मुलांविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यक्रम
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आरोग्य केंद्र आणि ‘इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या सभागृहात “किशोरवयीन मुले व त्यांच्या समस्या” या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
“पौगंडावस्थेतील शारीरिक, भावनिक, मानो-सामाजिक आणि हार्मोनल बदल आणि पालकत्व” या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.
विद्यापीठातील आरोग्य केंद्राचे समन्वयक डॉ शशिकांत दुधगावकर, यांनी आंतरराष्ट्रीय किशोरावस्था सप्ताहाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित करत असल्याचे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
किशोरवयीन मुलांच्या पालक म्हणून शीतल पवार यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या नियुक्त अध्यक्ष डॉ. शिल्पा दुधगावकरही उपस्थित होत्या.
यावेळी डॉ शैलजा माने यांनी “पौगंडावस्थेतील शारीरिक, भावनिक, मानसिक-सामाजिक आणि हार्मोनल बदल” या विषयावर मार्गदर्शन केले.
तर डॉ वैशाली देशमुख यांनी “वेगवेगळ्या पालकत्वाच्या शैली” या विषयावर भाषण केले.
या चर्चेनंतर प्रश्नोत्तराच्या सत्रात श्रोत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जवळपास दीड तास प्रश्नोत्तराचे सत्र चालले.