हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व मराठी नाट्यगीतांचा पुणेकरांना नजराणा

पुणे : शास्त्रीय संगीत हे धान्य व योग आहे. तसेच आध्यात्म आणि शास्त्रीय संगीताचा जवळचा संबंध आहे, असे सांगणा-या व स्वतंत्र प्रतिभा असलेल्या पद्मश्री पं. वेंकटेश कुमार यांनी हिंदुस्थानी संगीतातील शास्त्रीय गायिकी रसिकांसमोर सादर केली.तर, गायक ॠषिकेश बडवे व सावनी दातार यांनी गायलेल्या नाट्यगीतांमुळे मराठीतील अजरामर नाट्यगीतांचा नजराणा पुणेकरांसमोर पेश झाला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पहिल्या सत्रात गायक ॠषिकेश बडवे व सावनी दातार यांचा नाट्यसंगीताचा तर, पद्मश्री पं. वेंकटेश कुमार यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम दुस-या सत्रात झाला.

राग छायानट ने पं. वेंकटेश कुमार यांच्या शास्त्रीय गायनाला प्रारंभ झाला. त्यानंतर विविध वैशिष्ट्यपूर्ण रागातील रचना त्यांनी सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. त्यांना सुयोग कुंडकर (पेटी), भारत कामात (तबला), शिवराज पाटील व अंकिता गुप्ता देखील यांनी साथ केली.

पहिल्या सत्रात ॠषिकेश बडवे यांनी वसंत कानेटकर यांचे देवा घराचे ज्ञात कुणाला… हे नाट्यगीत सादर झाले. त्यावेळी मत्स्यगंधा नाटक, पं. जितेंद्र अभिषेक यांच्या सुरेख संगीताची आठवण रसिकांना झाली. त्यानंतर मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीतबाधा केलेले कुलवधू नाटकातील क्षण आला भाग्याचा… या सावनी दातार यांनी सादर केलेल्या गीताला रसिकांची विशेष दाद मिळाली. तर, कट्यार काळजात घुसली या नाटकातील गीताने मैफलीचा समारोप झाला. रवींद्र खरे यांनी निवेदन केले.

गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत युवा कलाकार व सायंकाळी ७ ते १० यावेळेत दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: