संत परंपरा तरुण पिढीपर्यंत पोहोचविली पाहिजे मुक्ता गरसोळे – कुलकर्णी यांचे मत

पुणे : आजचे तरुण अधिकाधिक आत्मकेंद्रित होत आहेत. थोड्याशा अपयशाने ते खचून जातात. थोडेसे जरी यश मिळाले तरी त्या यशाची जागा अहंकाराने घेतली जाते, हा अहंकार दूर करण्यासाठी आणि आपले संस्कार खोलवर रुजविण्यासाठी आजच्या तरुणांपर्यंत आपली संतपरंपरा आणि त्यांचे विचार पोहोचविले पाहिजेत,  असे मत व्याख्यात्या मुक्ता गरसोळे – कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

श्री सद्गुरु जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे श्री सद्गुरु जंगली महाराज यांच्या १३२ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात मुक्ता गरसोळे कुलकर्णी  यांचे ‘संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराज यांचे अनुबंध’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते.  यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्यासह महाराष्ट्राची संत परंपरा उलगडून सांगितली.ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे.

मुक्ता गरसोळे कुलकर्णी  म्हणाल्या, संत नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत होते. त्यांच्यामुळेच आज खऱ्या अर्थाने संत ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र आपल्यापर्यंत पोहोचू शकले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे कार्य करून ठेवले त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार संत नामदेव महाराज यांनी संपूर्ण देशामध्ये केला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज या दोन महान संतांचे एकत्र येणे हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या आध्यात्मिक इतिहासातील एक क्रांतिकारी घटना आहे.

शहरी लोकांमध्ये वारकरी परंपरेबद्दल अनेक गैरसमज आहेत. आपल्या स्वतःच्या पलीकडे न पाहणाऱ्या आजच्या पिढीला संतांच्या परोपकारी विचारांची जाणीव व्हायची असेल तर संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या विचारांची गरज आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहास संतपरंपरेमुळे अधिक वैभवशाली झाला आहे. हा वैभवशाली इतिहास आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे,  असेही त्यांनी  यावेळी सांगितले.

दिनांक १५ एप्रिल पर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. डॉ.योगेश गोडबोले, डॉ.सागर देशपांडे, दत्तात्रेय धाईंजे, श्रीनिवास पेंडसे, प्रा.मुक्ता गरसोळे- कुलकर्णी, डॉ. दत्तात्रेय तापकीर, डॉ अविनाश भोंडवे, डॉ. चंद्रशेखर टिळक, चंद्रकांत शहासने, विद्या लव्हेकर, सचिन पवार, आदित्य अभ्यंकर, डॉ. रवींद्र भोळे आदी मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: