दृष्टिहिनांची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आठव्या फेरीअखेर सौंदर्यकुमार प्रधान आघाडीवर तर किशन गंगोली दुसऱ्या क्रमांकावर
सातव्या व आठव्या फेरीत काही अनपेक्षित निकाल पहावयास मिळाले. सलग सहा वर्षे राष्ट्रीय विजेतेपदावर नाव करणाऱ्या कर्नाटकचा किशन गंगोली याला सातव्या फेरीत महाराष्ट्राच्या स्वप्निल शहा याने बरोबरीत रोखून अनपेक्षित निकाल नोंदविला. मात्र आठव्या फेरीत किशन याने तामिळनाडूचा के मरिमुथू याला बरोबरीत रोखले आणि विजेतेपदाच्या आशा कायम राखल्या.
आठव्या फेरीअखेर सौंदर्य कुमार याचे सात गुण झाले आहे तर किशन हा साडेसहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी होणाऱ्या नव्या फेरी बाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. शेवटच्या फेरीत सौंदर्य कुमार याची स्वप्निल शहा यांच्याशी गाठ पडणार आहे तर किशनची दर्पण इनानी याच्याशी लढत होईल. मरिमुथू याला मिलिंद सामंत याच्याबरोबर खेळावे लागणार आहे तर आर्यन जोशी याच्यापुढे सुभेंदू कुमार पात्रा याचे आव्हान असणार आहे.
मरिमुथू आणि स्वप्निल शाह यांचे प्रत्येकी सहा गुण झाले आहेत. महाराष्ट्राचा खेळाडू मिलिंद सामंत याने बी एल सोमिंदर याच्याविरुद्ध चा डाव चुरशीच्या लढती नंतर बरोबरीत ठेवला. त्यांचे प्रत्येकी साडेपाच गुण झाले आहेत. महाराष्ट्राचा खेळाडू आर्यन जोशी याचे साडेपाच गुण आहेत. त्याने सातव्या फेरीत गुजरातचा अनुभवी खेळाडू अश्विन मकवाना त्याला पराभूत केले होते. सौंदर्य कुमार याने सातव्या फेरीत सुभेंदू कुमार पात्रा (ओडिसा) या आपल्या सहकाऱ्याला पराभूत करीत आश्चर्यजनक विजय नोंदविला होता. पात्रा याने आठव्या फेरीत त्याच्यावर मात केली.
दृष्टीहिनांच्या आगामी आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धांसाठी भारताच्या खेळाडूंची निवड याच स्पर्धेतून केली जाणार असल्यामुळे या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.