Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

शिवलिंगपूजन कार्यक्रमाबद्दल दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे पतित पावन संघटनेची मागणी

पुणे : कसबा पेठेतील पवळे चौक येथे महाशिवरात्रीनिमित्त १ मार्च २०२२ रोजी वीस फुटाची शंकराची पिंड ठेऊन पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी वाहतूक पोलीस, मनपा यांची परवानगी घेण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार भगवे झेंडे, ध्वनिक्षेपक, माईक, श्रद्धांजली फ्लेक्स काढण्यात आले. कीर्तन, भजन, महाआरती करु नये, या सर्व अटींचे पालन करुन देखील पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यामुळे आता हिंदू सण साजरे करायचे की नाही, हा प्रश्न आमच्यासमोर असून पवळे चौकातील शिवलिंगपूजन कार्यक्रमाबद्दल दाखल केले खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी पतित पावन संघटनेने पत्रकार परिषदेत केली आहे.

पत्रकार परिषदेला राजाभाऊ पाटील, श्रीकांत शिळीमकर, स्वप्नील नाईक, अ‍ॅड. प्रशांत यादव, अ‍ॅड. सतिश गोरडे, संतोष आंघोळकर, सुनील तांबट, धनंजय गायकवाड, कुणाला कांबळे, योगेश वाडेकर, रोहित ढोके आदी उपस्थित होते.

महाशिवरात्रीला रात्री ८ वाजता १७ जणांना अटक करण्यात आली. आपला अपराध काय हे देखील, भाविक कार्यकर्त्यांना समजले नाही. दंगलीची कलमे व भाषण सभा झालेली नसतानाही कलम २९५ ए लावण्यात आले. काहींना पहाटे सोडून देण्यात आले, तर दुपारी फरार म्हणून घोषित करण्यात आले. कार्यकर्त्यांचे मोबाईल पोलिसांनी जबरदस्तीने काढून घेतले. पोलीस कस्टडीची मागणी देखील करण्यात आली. नोटीस नाही, नातेवाईकांना अटकेची माहिती नाही, अशी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. हिंदूंच्या धार्मिक आनंदाच्या उत्सवाचे रुपांतर पोलिसांनी तणावग्रस्त वातावरणात केले. पोलिसांनी सांगितलेल्या जागेवर स्टेज टाकून व सर्व सूचना पाळून देखील कारवाई करण्यात आली असून ही चुकीची आहे.

संघटनेचे स्वप्नील नाईक म्हणाले, विधानसभेत अधिवेशनात या घटनेबद्दल आमदार सुनील कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पोलिसांनी ११० ची नोटीस बजावण्यात आली. पुण्यातील अवैध धंदे पोलिसांना दिसत नाहीत. मात्र, हिंदू सण साजरे न करण्यासाठी ४०० ते ५०० पोलीस ठाण मांडून बसतात, हे कशाचे द्योतक आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी असून संविधानाची पायमल्ली होत असल्याचे चित्र पुण्यात या घटनेमधून दिसत आहे. तरी या भाविक कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी पतित पावन संघटना करीत आहे. मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही पद्धतीने जनआंदोलन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading