fbpx

नाट्यगीते आणि भक्तीसंगीतातून रसिकांना रामभक्तीची प्रचिती

पुणे : मी पुन्हा वनांतरी फिरीन हरिणीवाणी…ओठात घोळवीन राम प्रितीची गाणी, विजयपताका श्रीरामांची झुळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी, गुरु एक जगी त्राता, गुरु जननी जन्मदाता…अशी एकाहून एक सरस भक्तीगीते सादर करीत गायिका शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी दातार यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. पेशवेकालीन श्रीराम मंदिरात झालेल्या या कार्यकातील गीतातून रसिकांना रामभक्तीची प्रचिती आली.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त गायिका शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी दातार यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, उद्धव तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. रामनवमी उत्सवाचे यंदा २६१ वे वर्ष आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राग बागेश्री मधील प्रभू श्रीरामांचे वर्णन करणारी सुनो मेरी बिनती ही बंदीश सादर केली आणि त्याला जोडूनच कृष्णावर आधारीत त्रिताल सादर केला. यानंतर ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेले भक्तीगीत माई मोरे नैनन श्याम…हे शिल्पा पुणतांबेकर यांनी तर अमृताहूनी गोड नाम तुझे देवा हे गीत सावनी दातार यांनी सादर केले.
बोले जेणे बोले विठ्ठल डोले…कौसल्येचा राम बाई…हरी ओम म्हणा तुम्ही गोविंद म्हणा हरिनारायणा…या गीतांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मास्टर कृष्णाराव यांच्या संगीतनाटकातील अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. सुरेल गीतांच्या या सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांनी भरभरुन दाद दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: