एआयसीएफबी नॅशनल चेस चॅम्पियनशिप फॉर व्हिज्युअली चॅलेंजड् या राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेला पुण्यात प्रारंभ

पुणे :  दृष्टीहिनांसाठी देशातील सर्वात मोठ्या बुद्धीबळ स्पर्धांपैकी  एक असलेल्या ‘सावा हर्बल्स एआयसीएफबी नॅशनल चेस चॅम्पियनशिप फॉर व्हिज्युअली चॅलेंजड्’ या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन आज पीवायसी हिंदू जिमखाना येथे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल पंकज शहा व पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष विनायक पेठे, ऑल इंडिया चेस फेडरेशनच फॉर ब्लाइंडचे महासचिव डॉ मनीष थूल, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले, सावा हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश कपूर, शिव छत्रपती पुरस्कार विजेते चंद्रशेखर गोखले, २ वेळा शिव छत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले, पुणे शहरातील सर्वात तरुण ग्रँड मास्टर अभिमन्यू पुराणीक आणि रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे केदार गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना काकतकर यांनी पीवायसी हिंदू जिमखाना विविध खेळांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तर रघुनंदन गोखले यांनी बुद्धीबळासारख्या खेळात देखील फिटनेसचे महत्व अनन्यसाधारण असल्याची बाब अधोरेखित केली. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष विनायक पेठे यांनी प्रस्तीविक केले कर अविनाश ओगले यांनी सूत्रसंचालन केले. येत्या ९ तारखे पर्यंत सदर स्पर्धा सुरु असणार आहे .

संपूर्ण भारतातून ५५ खेळाडू या स्पर्धेत उतरले आहेत. या स्पर्धेतून चीन ,मॅसेडोनिया आणि फ्रान्स येथे होणाऱ्या आशियायी  आणि जागतिक स्पर्धांसाठी भारतीय संघांची निवड होणार आहे.

एका बँकेच्या जाहिरातीसाठी मॉडेल म्हणून काम केलेला आंतर राष्ट्रीय अंध खेळाडू आणि गुजराथकडून खेळणारा दर्पण इनानी या स्पर्धेचा अग्रमानांकित खेळाडू आहे अपेक्षेप्रमाणे दर्पण जिंकला परंतु आपल्या गुजराथच्या सहकाऱ्याला हरवताना  त्याने फक्त १२ खेळ्या घेतल्या . त्या मानाने गेली ६ वर्षे राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकणाऱ्या  किशन गंगोलीला महाराष्ट्राच्या राष्ट्रीय महिला विजेत्या वैशाली सालवकर ला ठरवताना आपले सर्व कसाब पणाला लावावे लागले. वैशालीने अखेर एक चूक केली आणि कर्नाटकच्या आशियाई विजेत्या किशन ने बाजी मारली.

महाराष्ट्राचा आर्यन जोशी गेल्या वर्षी अंधांच्या ऑलिम्पियाड मधल्या चमकदार कामगिरीमुळे सर्वांच्या नजरेत भरला होता. आज त्याने संयमी खेळाचे प्रदर्शन करून तामिळनाडूच्या रमेशला लंडन पद्धतीने खेळल्या गेलेल्या डावात पराभूत केले . अनुभवी आंतर राष्ट्रीय खेळाडू स्वप्नील शाह ने चांगली सुरुवात केली आणि एक प्यादे मिळवले पण बंगालच्या मेघा चक्रवर्तीने अप्रतिम बचाव  करून सामना बरोबरीत सोडवला.

आज असंख्य पुणेकर बुद्धिबळ प्रेमींनी सामने बघण्यासाठी गर्दी केली होती. यामध्ये पुण्याचा युवा ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक चा समावेश होता. बुद्धिबळ हा एकमेव खेळ असा आहे कि जेथे अंधांना डोळस खेळाडूंच्या नियमाने खेळावे लागते . फक्त त्यांचे पट वेगळे असतात.  चीन मध्ये ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या पॅरा आशियाई स्पर्धा, मॅसेडोनिया मध्ये होणाऱ्या जागतिक सांघिक स्पर्धा आणि फ्रान्स मध्ये होणाऱ्या जागतिक जुनियर स्पर्धा या तीन स्पर्धांसाठी पुरुष, महिला आणि जुनियर अशा महत्वाच्या स्पर्धांसाठी या स्पर्धेतून निवड होणार असल्यामुळे स्पर्धा चुरशीच्या होत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: