प्रशासक विक्रम कुमार नगरसेवकांना अजून एक दणका देणार; बळकावलेल्या मालमत्तांवर लवकरच करणार कारवाई

पुणे : पुणे महापालिकेत प्रशासकराज आल्यापासून अतिक्रमणविरोधी कारवाईने गती घेतली आहे.सुरवातीला या कारवाईचे कौतुक करण्यात येत होते. मात्र, केवळ हातावरचे पोट असणाऱ्यांना या कारवाईत लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. आतामात्र माजी नगरसेवकांनी महापालिकेच्या बळकावलेल्या मालमत्तांची मोजदाद चालू असून येत्या काही दिवसात या मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

विरंगुळा केंद्र, वाचनालये, व्यायामशाळा यासारख्या उपक्रमांच्या नावाखाली अनेक वर्षांपासून माननीयांनी महापालिकेच्या मोकळ्या जागा बळकावल्या आहेत. याशिवाय महापालिकेच्या बांधलेल्या जागादेखील काही माननीयांकडे आहेत. विशेष म्हणजे यातील काही जागांची महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे नोंददेखील नाही. या सर्व प्रकारच्या जागांची नोंद करण्याचे काम सुरू असून अशी यादी तयार झाल्यानंतर विभागानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

निवडणुका होऊ वेळेत होऊ शकत नसल्याने सध्या महापालिकचे आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे प्रशासकपद देण्यात आले आहे.त्यामुळे प्रशासन आपल्या पद्धतीने काम करीत आहे.अनेकजणांनी पालिकेच्या जागावर वर्षानुवर्षे ताबा मारलेला आहे. नगरसेवकपद असल्याने या जागांना एकप्रकारचे संरक्षण होते. कोणताही पक्ष याला अपवाद नाही. ज्याला संधी मिळाली त्यांनी जागा बळकावल्या आहेत.मात्र, प्रशासकांची सत्ता असल्याने या जागा शोधून त्यावर कारवाई करीत त्या जागा ताब्यात घेण्याचे नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

आर ७ योजनेतील अनेक सदनिका महापालिकेला मिळालेल्या आहेत.यातील बऱ्याच सदनिका विविध कारणांनी काही माननीयांनी ताब्यात घेतल्या आहेत. या सदनिकादेखील ताब्यात घेण्यात येणार आहेत. कोणत्या माजी नगरसेवकांकडे महापालिकेची कोणती मालमत्ता आहे, याची यादी बनविण्यात येत असून त्यानुसार लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: