पाणीप्रश्‍नासाठी राष्ट्रवादी प्रमाणे रासप पण आक्रमक


पुणे: पुण्यातील धनकवडीत राष्ट्रीय समाज पक्षाने हंडा मोर्चा काढला आहे. आंदोलनावेळी रासप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पाण्याच्या मागणीसाठी क्षेत्रीय कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा अडवत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. सध्या उन्हाळा सुरू आहे. एकतर या उन्हामुळे आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. आंबेगाव पठार 15, 16 नंबरमध्ये कोणत्याही सुविधा तर नाहीतच मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. समस्या एवढी भयंकर आहे, की पाण्यासाठी अक्षरश: सुट्टीही काढावी लागते. म्हणजे सगळी कामे सोडून पाण्यासाठी फिरावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी मोर्चा काढल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

पाणीपट्टी आम्ही देतो तर पाणीही भेटायला पाहिजे. निवेदने देऊन आम्ही थकलो. त्यामुळे आंबेगाव पठार 15, 16 ते क्षेत्रीय कार्यालय असा धडक हंडा मोर्चा आम्ही काढत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. रोज कोणीना कोणीतरी येते, फीत कापते पुढे काहीच होत नाही. निवेदनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी आंदोलनात रासप पुणे शहर अध्यक्ष, विनायक रुपनवर, अंकुश देवडकर, संजय माने, सुनीताताई किरवे, बिरुदेव अनुसे, राजेश लवटे, सचिन गुरवे, नामदेव सुळे, प्रथमेश गवळी, श्रद्धाताई कांबळे, आकाश पवार, दिपालीताई परदेशी, भरत अनुसे, अशोक कारंडे, भ्रमदेव अनुसे, रुपाली निंबाळकर आदी… उपस्थित होते.

दरम्यान पुणे शहरात पाण्याची समस्या वाढली आहे. पुण्यातील दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर आदी भागांत पाणी येत नसल्याने अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. महापालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली असून आंदोलन करण्यात आले होते. प्रशासक विक्रम कुमारांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली होती. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: