fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ऊर्जा विभागातील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची ग्वाही

शिर्डी : खासगीकरणाला माझा व महाविकास आघाडीचा विरोध असून यासंदर्भात मी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून भूमिका स्पष्ट केली आहे. ऊर्जा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही याची पालक या नात्याने पूर्ण काळजी घेणार असून ऊर्जा विभागातील कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.


विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या शिर्डी येथे मंगळवारी आयोजित २० व्या द्विवार्षिक महाअधिवेशनाला उदघाटक म्हणून ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आज संबोधित केले. यावेळी ते कामगारांना संबोधित करताना बोलत होते. याप्रसंगी त्यांच्याहस्ते संघटनेच्यावतीने प्रकाशित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
केंद्र सरकारने ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणासाठी गेल्या दोन तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. वीज कायद्यात दुरुस्ती करून खासगीकरणाचा दबाव वाढविला आहे. मात्र महाराष्ट्र सरकार या दबावाखाली बळी पडणार नाही आणि ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण होणार नाही,अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. केंद्राच्या खासगीकरणाच्या धोरणाला मी वेळोवेळी पत्र लिहून आणि बैठकांमध्ये विरोध केला आहे असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.

“वीज कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असून, मी सुद्धा गरीब व कष्टकरी कुटुंबातील असून त्यामुळे कुणावरही अन्याय होऊ देणार नाही,” अशी हमी ऊर्जामंत्री यांनी दिली.

कामगारांबद्दल गौरवोद्गार
कोरोना, चक्रीवादळ, पूरपरिस्थिती वा कुठल्याही आपात्कालीन स्थितीत जीवावर उदार होऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे कार्य कामगारांनी केल्याचे त्यांनी सांगितले. दुर्गम भाग तसेच रायगड किल्ल्यावर सुद्धा वीज यंत्रणा उभी केल्याबद्दल त्यांनी कामगारांचे कौतुक केले.मुंबईत ऑक्टोबर २०२० मध्ये वीज पुरवठा बंद झाला तेव्हा ४५० प्रति किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची पर्वा न करता आपल्या कामगारांनी काही तासात वीज पुरवठा सुरळीत केला,याबद्दल माझा तुम्हा सर्वांना सलाम आहे,असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तांत्रिक कामगार हे ऊर्जा विभागाचे कान आणि डोळे आहेत असेही ते म्हणाले.

महावितरणवर थकबाकी व कर्जाचा डोंगर उभा असताना सुद्धा कोरोना काळात आणि आज वाढते तापमान व कोळसा टंचाई चे संकट असताना सुद्धा मागणी एवढा वीजपुरवठा राज्यात केला जात आहे, ग्राहकांनी सुद्धा याची जाण ठेवून नियमित व वेळेत वीजबिल भरून सहकार्य करावे असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. कृषी वीज धोरण २०२०च्या माध्यमातून शेतकऱ्यांना थकबाकी मुक्तीसाठी तथा ग्रामीण भागातील वीज यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी सॊबतच कायम वीज पुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना आणली आहे.

ऊर्जा मंत्र्यांचे डोळे पाणावले

यावेळी बोलताना गरिबीचे चटके काय असतात याची मला कल्पना आहे, असे सांगताना त्यांनी बालपणीच्या खडतर आठवणी सांगितल्या. “गिरणी कामगार असलेल्या वडिलांच्या पायाला पकडून जेव्हा मी सायकल घेऊन मागितली तेव्हा ते मला ३०० मीटर तसेच फरफटत पुढे घेऊन गेले. बेटा माझ्याकडे तुला सायकल घेऊन देण्यासाठी पैसे नाहीत,” हे सांगताना डॉ. राऊत यांच्या डोळ्यात पाणी तरळले.

यावेळी व्यासपीठावर मराविम सुत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष रवी बारई, सरचिटणीस आर. टी.देवकांत, महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक डॉ.नरेश गीते, महानिर्मितीचे संचालक मानवेंद्र रामटेके, महापारेषण संचालक सुगत गमरे, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, महापारेषणचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड, मुख्य औद्योगिक संबध अधिकारी भारत पाटील, अधिक्षक अभियंता सुनिल काकडे व श्रीकृष्ण नवलाखे, मुख्य महाव्यवस्थापक सुधीर वानखेडे,तांत्रिक संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी ह व्यासपीठावर आदींची उपस्थिती होती. अधिवेशनाच्या उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्तविक उपसरचिटणीस नितीन पवार यांनी केले संचालन रुपाली देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन उपसर चिटणीस दिलीप क्षीरसागर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading