बासरी, सरोद आणि तबला वादनाचा ‘त्रिवेणी कलाविष्कार’

पुणे : बासरीतून उमटणा-या स्वरांचे माधुर्य… सरोद चा मन प्रसन्न करणारा सूर आणि तबल्याची सुरेख साथ यामुळे एका आगळीवगेळी वाद्य जुगलबंदी रसिकांच्या पसंतीस उतरली. वाद्यवादन क्षेत्रातील दिग्गज पं. रोणू मुजुमदार, पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार आणि पं. अरविंदकुमार आझाद यांनी आपल्या वादनातून त्रिवेणी कलाविष्कार पुणेकरांसमोर सादर केला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान म्हणजेच दि. १० एप्रिल पर्यंत गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पराग पांडव व सहका-यांचा ‘महाराष्ट्राची गीतगंगा’ हा कार्यक्रम पहिल्या सत्रात पार पडला. तर, जुगलबंदी च्या कार्यक्रम दुस-या सत्रात झाला.

दुस-या सत्रात बासरी, सरोद आणि तबलावादनातून देश रागातील पारंपरिक आलाप व बंदिश सादर करीत हिंदुस्थानी संगीताचा नादमधुर नजराणा रसिकांसमोर पेश झाला. पं. रोणू मुजुमदार व पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार यांची बासरी व सरोद ची जुगलबंदी आणि त्याला पं. अरविंदकुमार आझाद यांची तबल्याची साथ रसिकांना अनुभवायला मिळाली. नितीश पुरोहित, कल्पेश साकला यांनी या जुगलबंदीला साथसंगत केली.

पहिल्या सत्रात पराग पांडव आणि सहका-यांनी भक्तिगीतांची सादर केलेली शृंखला हे ‘महाराष्ट्राची गीतगंगा’ या मैफलीचे वैशिष्ट्य ठरले. देहाची तिजोरी… देव देव्हा-यात नाही… झाला महार पंढरीनाथ… निजरूप दाखवा हो… कानडा राजा पंढरीचा… अशी गीते यामध्ये सादर झाली. यांसह महाराष्ट्रातील गीतप्रकारातील वैविध्य देखील कलाकारांनी सादर केले. समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या गीताने पहिल्या सत्रातील कार्यक्रमाचा समारोप झाला.

गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत युवा कलाकार व सायंकाळी ७ ते १० यावेळेत दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: