fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

‘नो हॉंकींग मॅन आॅफ पुणे’ सन्मान देवेंद्र पाठक यांना प्रदान

पुणे : साधारणत: पुण्यात दररोज एक कोटी पेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो व यातील ९० टक्के हॉर्न हे अनावश्यक असतात. त्यामुळे हॉर्नचा वापर न करता तब्बल ५० हजार किमी वाहतुकीचे नियम पाळून गाडी चालविणा-या देवेंद्र पाठक यांना नो हॉंकिंग मॅन आॅफ पुणे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ध्वनीप्रदूषण न करता देखील गाडी चालविणा-या चालकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न या सन्मानाच्या निमित्ताने करण्यात येत आहे.

लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनतर्फे पुणे पोलीस आयुक्तालय येथे सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्या हस्ते देवेंद्र पाठक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे पद्माकर पुंडे, किरण पाटील, भारत डोरले आदी उपस्थित होते.

डॉ.रवींद्र शिसवे म्हणाले, जून २०१९ ते मार्च २०२२ याकाळात पुणे आणि परिसरात ५० हजार पेक्षा अधिक किमी हॉर्न न वाजविता देवेंद्र पाठक यांनी प्रवास केला आहे. पाठक यांचे कार्य पुणेकरांसाठी मोठी प्रेरणा असेल आणि जास्तीत जास्त पुणेकर पुढे येउन नो होन्कींग ची संकल्पना राबवतील व पुण्याचे ध्वनी प्रदूषण कमी करण्यास मदत करतील.

देवेंद्र पाठक म्हणाले, बहुतांशी पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास ट्रॅफिक मध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना ब-याचश्या दुष्परिणामांना सामारे जावे लागते, त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम राबवायला हवेत. नो हाँकीग डे अर्थात पुण्यात हॉर्न ठेवा एक दिवस बंद अशी संकल्पना आम्ही डिसेंबर महिन्यात राबवितो. मात्र, आता प्रत्यक्ष हे पाळणा-या पुणेकरांचा सन्मान करण्यात येत असल्याचा आनंद आहे.

सध्या पुणे हे एकमेव असे शहर आहे जिथे वाहनांची संख्या ही लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, वाढत्या ध्वनिप्रदूषणात हॉर्न चा आवाज प्रमुख कारण आहे. त्याच प्रमाणे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हृदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा देखील सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading