हिंदुस्थानी संगीतातील वैविध्यपूर्ण रचनांनी सजला ‘स्वराभिषेक’

पुणे : नाट्यगीते, अभंगांसह शास्त्रीय संगीत रचनेने स्वराभिषेकाला थाटात प्रारंभ झाला. श्री रागातील चलो रे माई रामसीया दर्शन को … या बंदिशीने मंजुषा पाटील यांनी मैफलीला सुरुवात केली. तर, पं. शौनक अभिषेकी यांनी घेई छंद…या गीताचे सादरीकरण करीत रसिकांची मने जिंकली. हिंदुस्थानी संगीतातील वैविध्यपूर्ण रचनांनी या दोन्ही दिग्गजांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान म्हणजेच दि. २ ते १० एप्रिल पर्यंत गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात गायक पं. शौनक अभिषेकी व मंजुषा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, अक्षय गोडसे, कुमार वांबुरे, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी,राजाभाऊ पायमोडे, माऊली रासने, बाळासाहेब सातपुते आदी उपस्थित होते.

संगीत महोत्सवाची सुरुवात मंगलध्वनी कार्यक्रमाने झाली. त्यामध्ये केदार जाधव, नितीन दैठणकर, संजय उपाध्ये, अजय गायकवाड व अभिजीत जाधव यांची सनई व व्हायोलिनची जुगलबंदी पुणेकरांना अनुभविता आली. बाप्पा मोरया, श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… या गीताचे सादरीकरण व्हायोलिन व सनईवर झाले. मोरया रे बाप्पा मोरया रे… या गीताला रसिकांनी टाळ्यांच्या माध्यमातून साथ दिली. सनईवर सादर झालेल्या जय गणेश दगडूशेठ गणपती देवा… या गाण्याने उपस्थितांची मने जिंकली.

शौनक अभिषेकी म्हणाले, ज्या शहरात दगडूशेठ हलवाई गणपती आहे, तेथे आम्ही राहतो, हे आमचे भाग्य आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टने पुण्याची ओळख जगाच्या नकाशावर वेगळ्या पद्धतीने नेली. भारतात अनेक धर्मस्थळे आहेत, पण सामाजिक व सांस्कृतिक स्तरावर मोठया प्रमाणात उत्सव साजरे करणारे हे एकमेव धार्मिक ट्रस्ट आहे.

हेमंत रासने म्हणाले, यावर्षी नवोदित व युवा कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले जात असून हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत युवा कलाकार व सायंकाळी ७ ते १० यावेळेत दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी म्हणाले, यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात शास्त्रीय संगीत, वादन जुगलबंदी, लोकगीते, भारुड, पोवाडे, नाटयगायनासह कथक नृत्याविष्काराचा समावेश आहे. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. स्वराभिषेक कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: