कोरोनावरील विजय साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य स्वराज्यपताका
पुणे:कोरोना महामारीवरील विजयाप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पुणे च्या वतीने भव्य स्वराज्य पताका फडकाविण्यात आली. यावेळी कोरोनावर मात करण्यासाठी काम केलेल्या विविध क्षेत्रातील योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी समाजातील सर्व घटकांच्या अविश्रांत मेहनत व एकजुटीमुळे कोरोनाचा पराभव करणे शक्य झाले असे सांगितले. ते म्हणाले, “कोरोना महामारीवरील विजय साजरा करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य स्वराज्यपताका उभारण्यात आली आहे. यानिमित्ताने कोरोनाच्या विरोधातील लढ्यात अविश्रांतपणे राबणाऱ्या डॉक्टर्स, परिचारीका, शासन, प्रशासन, अँम्ब्युलन्स चालक, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्वांच्या कष्टाला आम्ही सलाम करीत आहोत. कोरोनामुक्तीचा हा पॅटर्न सामाजिक सद्भाव आणि एकजुटीचा संदेश देतो. या लढ्यात सहभागी सर्वांचे आम्ही आभारी असून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञ आहोत. ”
मराठी नववर्षाचे यानिमित्ताने आगळेवेगळे स्वागत करण्यात आले असून कोरोनामुक्तीचा जागर यावेळी करण्यात आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्तीशः या लढ्याची सुत्रे हाती घेऊन पुण्यात अतिशय सक्षमपणे यंत्रणा कामाला लावली होती. याप्रसंगी प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, कोरोनाने आपणास काही गोष्टी शिकवल्या. आरोग्याकडे लक्ष देण्यास शिकविले. स्वच्छतेसाठी काम करायला शिकविले. कोरोनामुक्तीची पहाट उगविली असताना हा संदेश आपण विसरता कामा नये.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख , सुनील खाटपे, शिल्पा भोसले , संतोष जोशी , वैभव कोठुळे , मिलिंद बालवडकर ,शुभम माताळे ,विक्रम जाधव ,पंकज साठे ,प्रदीप भोसले इत्यादी प्रमुख उपस्थित होते
