Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

‘बोंजौर इंडिया २०२२’ अंतर्गत पुण्यात कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन

पुणे : ‘एम्बसी ऑफ फ्रेंच इन इंडिया’, ‘फ्रेंच इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’, ‘अॅलिओस फ्रॉसेस’ आणि ‘कॉन्सिलेट ऑफ फ्रान्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ४ थ्या ‘बोंजौर इंडिया’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लना यांनी याची नुकतीच घोषणा केली. भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि भारत-फ्रान्स राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील १९  शहरांमध्ये हा महोत्सव होत असून त्यात पुणे शहराचादेखील समावेश आहे. या महोत्सवांतर्गत १२० कार्यक्रम होणार असून शिक्षण, विज्ञान, साहित्य, सिनेमा, गॅस्ट्रोनॉमी, स्ट्रीट आर्ट, परफॉर्मिंग आर्ट्स आणि फोटोग्राफी यांसारख्या विषयांचा त्यात समावेश असेल. हा कार्यक्रम पुण्यात ३१ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत होणार आहेत.

‘बोंजौर इंडिया’विषयी सांगताना राजदूत इमॅन्युएल लना म्हणाले, भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य वर्धापन वर्षानिमित्त ‘बोंजौर इंडिया’ ही फ्रान्सकडून भारतीयांना एक भेट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि फ्रान्समध्ये घनिष्ट मैत्री असून या महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही विचारांची देवाणघेवाण करून हे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, या दोन्ही राष्ट्रांच्या संस्कृतीचा अभ्यास करून आणि कलेची सह-निर्मिती करून, दोन्ही देशांचे विचार एकत्र करून जवळीक साधता येईल. याचबरोबर आपल्या दोन्ही देशांमधील विचारांची मुक्त देवाणघेवाण करून नवीन विचारांची बीजे रोवली जातील त्यामुळे पुढील आव्हानांचा सामना करण्यास मदत होईल.

पुण्यात होणाऱ्या उपक्रमात विविध कार्यक्रम होणार असून तरूण, विद्यार्थी, महिला, वयस्कर व्यक्ती या  सर्वांना या कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. ३१ मार्च रोजी ‘एस थालाः अॅन इंडियन सूट’ हा फ्रेंच साहित्यावर आधारित कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता द बॉक्स, एरंडवणे येथे हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमास प्रवेश सशुल्क आहे. .

८ एप्रिल रोजी ‘प्लकिंग रागम’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून यावेळी फ्रेंच वीणावादक लीना बेलार्ड यांच्यासह गायिका वृंदा मनिकावासन आणि मृदुंगवादक अश्विनी श्रीनिवासन यांचे सादरीकरण होणार आहे. माझदा हॉल येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य असणार आहे.

१६ एप्रिल रोजी ‘रिक-शो’मध्ये आर्ट चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. चाकावरचा सिनेमा या संकल्पनेअंतर्गत रिक्षाच्या मागील बाजूस असलेल्या पडद्यावर यावेळी सिनेमा पाहायला मिळणार आहे. बोट क्लब रोडवरील मॅक्सम्युलर भवन येथे सायंकाळी ६ वाजेपासून हा कार्यक्रम सुरू होणर असून येथे विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.

२३ व २४ एप्रिल रोजी ‘सर्वांसाठी पुणे’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सार्वजनिक ठिकाणी लैंगिकतेची भूमिका काय?’ हा प्रश्न या प्रदर्शनातून अधोरेखित केला जाणार आहे. औंध आयटीआय रस्त्यावरील एफक्यूबसमोर दोन दिवस दिवसभर हे प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार आहे. या प्रदर्शनात प्रवेश विनामूल्य असून सर्वांसाठी खुले असणार आहे.

आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे औचित्य साधून ‘लेट्स डान्स’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये क्लेरमोंट फेरंड या लघुपट महोत्सवातील नृत्य ही समान संकल्पना असलेले चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हा महोत्सव २८ एप्रिल रोजी कला छाया सांस्कृतिक केंद्राच्या अॅम्फी थिएटरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांना प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर हा प्रवेश मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading