रेल्वे सल्लागार समिती, मुंबई विभागावर नीता रजपूत यांची नियुक्ती
पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रांतिक प्रतिनिधी आणि पुणे महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा यांची रेल्वे सल्लागार समिती, मुंबई विभागावर नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिंदमबरम यांच्या शिफारशीने जनरल मॅनेजर दिपक मुलचंदाणी मुंबई डिव्हिजन यांनी नीता रजपूत यांनी नियुक्तीचे पत्र दिले.
नीता रजपूत गेली ४० वर्ष काँग्रेस पक्षाचे सक्रीय काम करीत आहेत. पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष, पुणे शहर महिला काँग्रेसच्या २ वेळा अध्यक्षा, पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस, विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष, सेवादलाच्या कार्यकर्ती आदी पदांवर त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. नीता रजपूत यांचे शिक्षण एम. कॉम. एम. एस. डब्लू. असल्यामुळे सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. स्त्री संघटना औद्योगिक मंडळ तसेस संयुक्त स्त्री संस्था यांच्या त्या अध्यक्षा आहेत. स्त्री संघटना औद्योगिक मंडळातर्फे दररोज अंदाजे २०० महिलांना काम दिले जाते. तसेच संयुक्त स्त्री शिक्षण संस्थेच्या इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमांच्या शाळा आहेत.
रेल्वे सल्लागार समितीवर काम करीत असताना रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन तसेच प्रवाशांना जास्तीत जास्त सोयी कशा मिळतील यासाठी प्रयत्न करेन असे नीता रजपूत यांनी सांगितले. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड नियुक्ती झाल्याबद्दल नीता रजपूत यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नीता रजपूत यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
