नवीन अनिता भाभी म्‍हणते, ”प्रेक्षकांना भावूक करणे सोपे आहे, पण हसवणे तितकेसे सोपे नाही”

अभिनेत्री विदिशा श्रीवास्‍तवने नुकतेच एण्‍ड टीव्‍हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये नवीन अनिता भाभीच्‍या भूमिकेत प्रवेश केला. इंडस्ट्रीमध्‍ये तिच्‍या प्रवेशाबाबत चर्चा सुरू असताना आम्‍ही तिच्‍यासोबत अनिता भाभीच्‍या भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍याचा अनुभव, पडद्यामागील धमाल, पहिल्‍यांदाच साकारत असलेल्‍या विनोदीशैलीबाबत मत अशा अनेक गोष्‍टींबाबत गप्‍पागोष्‍टी केल्‍या. या गप्‍पागोष्‍टी पुढीलप्रमाणे:

१. नवीन अनिता भाभीची भूमिका साकारताना कसे वाटते? या भूमिकेसाठी निवडण्‍यात आले तेव्‍हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?

अनिता भाभी प्रख्‍यात भूमिका आहे, जी लोकप्रिय असण्‍यासोबत तिचे अनेक चाहते आहेत. मला ही संधी मिळण्‍याचा अभिमान वाटण्‍यासोबत आनंद होत आहे. मला निवडण्‍यात आले तेव्‍हा माझी पहिली प्रतिक्रिया होती, ‘अरे देवा! असे खरंच घडतंच का!’ मला खूप आनंद झाला. मी मनोरंजनपूर्ण पात्र व विनोदी कथानकामुळे नेहमीच ही मालिका पाहण्‍याचा आनंद घेतला आहे. मला कधीच वाटले नव्‍हते की, मी एकेदिवशी या मालिकेमध्‍ये प्रमुख भूमिका साकारत असेन. मला ही संधी मिळण्‍याचा आणि सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे आसिफ शेख, रोहिताश्‍व गौड व शुभांगी अत्रे यांसारख्‍या परिपूर्ण व प्रतिभावान कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करण्‍याचा आनंद होत आहे. मी माझ्या क्षमतांवर विश्‍वास दाखवण्‍यासाठी आणि मला ही अद्भुत संधी देण्‍यासाठी संजय व बिनायफर कोहली जी यांचे आभार मानते. मला खूपच धन्‍य वाटत आहे. माझ्या अवतीभोवती असलेल्‍या सर्वांना, विशेषत: माझ्या मैत्रिणी व कुटुंबियांना ही बातमी समजल्यापासून खूपच आनंद झाला आहे.

माझे कुटुंबिय ‘भाबीजी घर पर है’चे निस्‍सीम चाहते आहेत आणि ते नियमितपणे ही मालिका पाहतात. म्‍हणून मला अनिता भाभीच्‍या भूमिकेसाठी विचारण्‍यात आले तेव्‍हा माझ्या सर्व कुटुंबियांना खूपच आनंद झाला. आमच्‍यापैकी कोणीही विचार केला नव्‍हता की एकेदिवशी मला अनिता भाभीची भूमिका साकारण्‍याची संधी मिळेल. ऑडिशन्‍सदरम्‍यान देखील माझे कुटुंबिय ते कसे घडले आणि मला निवडण्‍यात आले की नाही हे जाणून घेण्‍यासाठी उत्‍सुक होते. आणि मी त्‍यांना ही बातमी सांगताच त्‍यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. घरामध्‍ये लहानसे सेलिब्रशेन सुरू असल्‍यासारखे वाटले.

२. विदिशा व अनिता भाभी यांच्‍यामध्‍ये कोणते साम्‍य आणि फरक आहेत?

फक्‍त साम्‍य आहेत. अनिता भाभी समकालीन व ‘आजची महिला’ आहे. तिचे व्‍यक्तिमत्त्व प्रबळ व इतरांपेक्षा वरचढ आहे, जे तिच्‍या भूमिकेमधील सर्वात महत्त्वपूर्ण पैलू आहेत. तिचे स्‍वत:चे विश्‍व आहे आणि ती खूपच बोल्‍ड आहे. ती विश्‍वास असलेल्‍या गोष्‍टींना पाठिंबा देते आणि सहजपणे हार मानत नाही. वास्‍तविक जीवनात मी अगदी तिच्‍यासारखीच आहे. म्‍हणून मला या भूमिकेसाठी निवडण्‍यात आले तेव्‍हा सहजपणे तिच्‍यामध्‍ये सामावून जाऊ शकले.

३. या मालिकेमधील अनिता भाभीव्‍यतिरिक्‍त तुला आवडणारे पात्र कोणते आणि का?

प्रत्‍येक पात्र अत्‍यंत मनोरंजनपूर्ण आहे आणि त्‍यांच्‍यामध्‍ये अद्वितीय पैलू सामावले आहेत, पण विभुती नारायण मिश्रा माझा आवडता आहे. ही भूमिका माझे आवडते अभिनेते – अत्‍यंत प्रतिभावान व परिपूर्ण अभिनेते आसिफ शेख जी यांनी साकारली आहे. दुसरी बाब म्‍हणजे या एकाच भूमिकेमध्‍ये विविधता व अनेक पात्र सामावलेले आहेत. सुरेखपणे व सुलभपणे हे सर्व पात्र साकारणे सोपे नाही. मी या प्रत्‍येक धमाल पात्राला पाहण्‍याचा आनंद घेतला आहे. त्‍यांची विनोदी शैली परिपूर्ण आहे. त्‍यांना माझा सलाम. आणि

आता मला त्‍यांच्‍यासोबत काम करण्‍याची संधी मिळाली आहे. त्‍यांच्‍याकडून भरपूर काही शिकण्‍यासारखे आहे.

४. तू नुकतेच शूटिंगला सुरूवात केली आहेस. आम्‍हाला मालिका ‘भाबीजी घर पर है’च्‍या सेटवरील तुझ्या शूटिंगच्‍या पहिल्‍या दिवसाबाबत, तसेच पडद्यामागे घडलेल्‍या धमालबाबत सांग.

मी मालिकेसाठी शूटिंगला सुरूवात करून काहीच आठवडे झाले आहेत, पण असे वाटते की मी त्‍या सर्वांना पूर्वीपासूनच ओळखते आणि त्‍यांच्‍यासोबत माझे खास नाते आहे. मी पहिल्‍या दिवशी काहीशी नर्व्हस होते, पण सर्वांनी, विशेषत: रोहिताश्‍व जी यांनी मला कम्फर्टेबल केले. त्‍यांच्‍यासोबतच मी माझा पहिला सीन शूट केला. ते अद्भुत सह-कलाकार असण्‍यासोबत विनम्र व्‍यक्‍ती देखील आहेत. मला तुम्‍हाला एक सिक्रेट सांगायचे आहे: मालिकेमध्‍ये सर्व कलाकार त्‍यांच्‍या भूमिकांमधून इतके सामावून गेले आहेत की ते तुम्‍हाला हसवण्‍यासाठी जरादेखील संधी चुकवत नाहीत. आम्‍ही विनोद करत राहतो आणि एकमेकांची मस्‍करी करतो, ज्‍यामुळे आम्‍हाला आनंदी व उत्‍साही राहण्‍यास आणि शूटिंगदरम्‍यान आमचा सर्वोत्तम अभिनय सादर करण्‍यास मदत होते. आमच्‍या होळी एपिसोडदरम्‍यान डान्‍स सीक्‍वेन्‍ससाठी शूटिंग करताना टीएमटीने (टिका, माखन व टिल्‍लू) अचानक त्‍यांच्‍या अनोख्‍या शैलीमध्‍ये गाणे गाण्‍यास सुरूवात केली आणि सेटवरील सर्वजण अचंबित झाले. असे उत्‍साही व प्रेमळ व्‍यक्‍ती आसपास असल्‍याने खूप धमाल येते.

५. विनोदी शैली तुझ्यासाठी नवीन आहे. या शैलीशी जुळून जाणे किती सोपे किंवा अवघड राहिले आहे? तुला इतर कोणत्‍या शैली आवडतात किंवा साकारायला आवडतील?

एक कलाकार म्‍हणून माझे मत आहे की तुम्‍ही नवीन आव्‍हान स्‍वीकारले नाही, नवनवीन गोष्‍टी शिकल्‍या नाहीत आणि त्‍यामध्‍ये सामावून गेला नाहीत तर तुम्‍ही सुस्‍त होऊन जाल. मी नेहमीच नवीन शैली, विशेषत: विनोदी शैली साकारण्‍यास उत्‍सुक आहे. मी काल्‍पनिक, पौराणिक, ऐतिहासिक व रोमँटिक ड्रामांचा भाग राहिले आहे. पण यावेळी मी विनोदी शैली साकारण्‍यासाठी मनाने तयारी केली, ज्‍यामुळे मला माझ्या कम्‍फर्ट झोनमधून बाहेर पडण्‍यास मदत झाली. मला सांगावेसे वाटते की, विनोदी ही सर्वात अवघड शैली आहे. प्रेक्षकांना भावूक करणे सोपे आहे, पण हसवणे तितकेसे सोपे नाही. प्रेक्षकांना हसवण्‍यासाठी अभिव्‍यक्‍ती, विनोदाची वेळ व देहबोली असे अनेक पैलू महत्त्वाचे असतात आणि विनोदीशैली उत्तमरित्‍या करण्‍यासाठी या पैलूंवर खूप मेहनत घ्‍यावी लागते.

६. अनिता भाभीमध्‍ये चमक व स्‍टाइल आहे आणि ती स्‍टायलिश साड्या परिधान करते. विदिशाला देखील साड्या आवडतात का? तुझी स्‍टाइलबाबत काय खासियत आहे? तू कोणत्‍या प्रकारचे पोशाख, मेकअप व आभूषणांना प्राधान्‍य देतेस?

अनिता भाभी उत्‍साही आहे. ती अत्‍यंत मोहक व स्‍टायलिश आहे. ती तिच्‍या मोहक व आकर्षक लुकसह सर्वांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी ओळखली जाते. माझी स्‍टाइल अगदी तिच्‍यासारखीच साधी, मोहक व आकर्षक आहे. पण मी आरामदायी वाटेल अशा पोशाखांना प्राधान्‍य देते आणि मर्यादित आभूषणे घालते. मला फारसा मेक-अप करायला आवडत नाही. पण कोणत्‍याही प्रसंगासाठी तयारी करायची असेल तर मी थोडक्‍यातच मेक-अप करते आणि माझा लुक आकर्षक दिसण्‍यासाठी केस मोकळे ठेवते. मी नेहमीच आरामदायीपणा देणारे पोशाख व मर्यादित आभूषणांची निवड करते. अनिताप्रमाणेच मला देखील स्‍टायलिश ब्‍लाऊजसोबत साड्या परिधान करायला आवडते. पण सोबतच मला जीन्‍स देखील आवडतात. मी माझ्या आवडत्‍या जीन्‍सच्‍या जोडीला कधीच दूर ठेवणार नाही आणि त्‍यांच्‍यासोबत स्‍टायलिश टॉप, हील्‍स व आभूषणे परिधान करते.

 

Leave a Reply

%d bloggers like this: