गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढत राष्ट्रवादी कडून केंद्र सरकारचा निषेध
पुणे:केंद्र सरकारच्या अख्यारीत असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये दररोज वाढ होत असून, ही वाढ थांबावी या हेतूने पर्वती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातारा रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तर काही कार्यकर्त्यांनी यावेळी मुंडन करत आपला निषेध नोंदवला.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. या आंदोलनाला पर्वती विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष श संतोष नागरे, महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी ,प्रवक्ते प्रदीप देशमुख, पर्वती विधानसभा कार्याध्यक्ष .विपुल म्हैसूरकर ,पर्वती विधानसभा महिला अध्यक्ष . श्वेता कामठे होनराव, विधानसभा युवक अध्यक्ष अमोल नन्नवरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनंदिन जीवन जगत असताना घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल या आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत. या वस्तूंचे दर वाढत राहिले तर एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे महिन्याचे बजेट कोलमडते. प्रशांत जगताप म्हणाले ,गेल्या काही दिवसात निवडणुका असल्यामुळे थांबवलेले ही दरवाढ आता अचानकपणे पुन्हा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे केवळ निवडणुकीपुरते लोकांची फसवणूक करायची निवडणूक संपली ,की पुन्हा लोकांच्या खिशावर दरोडा टाकायचा हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेची लूट चालवली आहे, ही लूट थांबवावी यासाठी आजचे आंदोलन असून सर्वसामान्य नागरिकांनी यातून धडा शिकावा. व पुन्हा भारतीय जनता पार्टीला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुठेही सत्तेत बसवु नये” असे प्रशांत जगताप म्हणाले.
