चिमुकल्या धनश्रीवर मेंदू व मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांचा निर्भयच्यावतीने सन्मान 

पुणे : धनश्री सोनवणे या दहा वर्षांच्या चिमूकलीवर कोरोना काळात जोखीम पत्करून वायसीएम रुग्णालय, पिंपरी येथे मेंदू व मणक्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आली. वेळेवर देवदूतांसारखे धावून आलेले येथील न्यूरोसर्जन डॉ. अमित वाघ व त्यांच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीमचा निर्भय युवा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.

निर्भय युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल गायकवाड, माऊलीनाथ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. पवन सोनवणे, निर्भय प्रतिष्ठानचे संचालक अमित जाधव यांच्या हस्ते व धनश्री चे आई – वडील कुटुंबीय यांच्या उपस्थितीत अनौपचारिक गौरव करण्यात आला.

दरम्यान, धनश्री (वय 10) तिच्यावर मागील पाच वर्षांपूर्वी मेंदू व मणक्याची अवघड शस्त्रक्रिया कमांड हॉस्पिटल पुणे येथे करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या डोक्यापासून मणक्या पर्यंत एक रॉड बसविण्यात आला होता. मागील दोन वर्षांपासून त्यामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे तो रॉड काढून दुसरी शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक होते. कोविड आजाराच्या गंभीर पार्श्वभूमीवर कमांड हॉस्पिटल यांनी ऑपरेशन थिएटर बंद असल्यामुळे दुसरी शस्त्रक्रिया करता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर वायसीएम रुग्णालय पिंपरी येथे सदर शस्त्रक्रिया होऊ शकते, याची संपूर्ण माहिती घेतल्यावर याठिकाणी शस्त्रक्रियेसाठी तिला ऍडमिट करून घेण्यात आले. निर्भय प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल गायकवाड यांच्या समन्वयातून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरोसर्जन डॉ. अमित वाघ व त्यांच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीमने धनश्री वर यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यासाठी वायसीएम रुग्णालयातील लॅबच्या प्रमुख डॉ. मीना सोनवणे व नगरसेवक विकास डोळस त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून वेळोवेळी योग्य ती सर्व मदत मिळवून दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: