शिवजयंती निमित्ताने हिंदराज ग्रुप कडून गिर्यारोहक स्मिता घुगे तसेच कोविड काळात अभूतपूर्व कार्य करणार्‍या परिचारिका सरोज पिल्ले, शुभांगी पाटील यांचा सन्मान

पुणे : गंज पेठेतील मासेआळी परिसरातील ‘हिंदराज ग्रुप’ने शिवजयंती उत्सव मिरवणूक तसेच मंडळाच्या देखाव्यासमोर ध्वनिक्षेपकाचा वापर न करता त्यासाठी खर्च होणा-या रकमेचा विनीयोग विक्रमवीर गिर्यारोहक, कोविड काळात अभूतपूर्व कार्य करणार्‍या परिचारिकांचा सन्मान व परिसरातील मुलांना मनोरंजन व प्रबोधनपर गोष्टींची पुस्तके तसेच आबासाहेब अत्रे प्रशालेतील निवडक मुलांची किशोर मासिकाची वार्षिक वर्गणीची रक्कम देत आगळयावेगळया पध्दतीने साजरा केला.

कार्यक्रमात यावर्षी एव्हरेस्ट बेस कँपवर ७५ फुटी भगवा झेंडा फडकविणार्‍या गिर्यारोहक स्मिता घुगे हीचा तर कोविड काळात अभूतपूर्व कामगिरी करणा-या नायडू रुग्णालयातील परिचारिका सरोज पिल्ले, शुभांगी पाटील तसेच श्रावणी बनसोडे यांचा सन्मान संदर्भतज्ज्ञ व ग्रंथप्रसारक प्रसाद भडसावळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व चरित्र देऊन करण्यात आला.

‘शारिरीक तंदुरुस्तीसाठी व्यायाम तर मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन गरजेचे आहे. या दोहोंचा समन्वय साधत हिंदराज ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक व ध्वनीक्षेपकाचा खर्च टाळून कृतज्ञता व ग्रंथप्रसाराला दिलेल्या प्राधान्याचे विशेष कौतुक वाटते. साहित्य, क्रीडा व आरोग्य यांचा त्रिवेणी संगम शिवजयंतीनिमित्ताने जुळून आला आहे.’ असे मत प्रसाद भडसावळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी लखन बंडा, आनंद कोटला, योगेश चिंतल, परेश कल्याणी, अक्षय परदेशी, संदीप चिलका, आनंद दासा, श्रीकांत ओझा, प्रमोद यमजाल, साहिल शिंगाराम, आकाश श्रीमल, हर्षल कोंपेल्ली, आदित्य अकोलकर आदी उपस्थित होते. भडसावळे यांनी परिसरातील मुलांना पुस्तके तसेच क्रीडासाहित्याचे वाटप केले. उत्तरार्धात मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी मर्दानी साहसी खेळांच्या सादरीकरणास उपस्थितांची उस्फूर्त दाद मिळाली.

Leave a Reply

%d bloggers like this: