तुम्ही सगळे श्रेय घ्या, पण एसटीचा संप मिटवा – चंद्रकांत पाटील

मुंबई : मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. गिरणी कामगारांच्या संपात लाखो कामगारांची घरे कशी उध्वस्त झाली ते अनुभवले आहे. एसटीचा संप मिटला नाही तर एक लाख संसार उध्वस्त होतील. उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही सगळे श्रेय घ्या पण एसटीचा संप मिटवा, असे कळकळीचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलताना केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “माझे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. आईसुद्धा कापड गिरणीत काम करायची. दत्ता सामंत यांनी पुकारलेल्या गिरणी कामगारांच्या संपात लाखो कामगारांची घरे कशी उध्वस्त झाली ते पाहिले आहे. मी स्वतः या संपामुळे होरपळलो आहे. एसटीचा संप मिटला नाही तर एक लाख कुटुंबे संकटात येतील. गेले चार महिने एसटी कर्मचारी रस्त्यावर बसले आहेत, काहीजण निराशेने आत्महत्या करत आहेत आणि सरकार दुर्लक्ष करत आहे. अजितदादांना माझे आवाहन आहे की, सगळे श्रेय तुम्ही घ्या पण संप मिटवा. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसमोर चांगला प्रस्ताव मांडला तर ते सुद्धा दोन पावले मागे जातील.”

त्यांनी सांगितले की, एसटीच्या संपामुळे कर्मचाऱ्यांचे वेतनाअभावी खूप हाल होत आहेत. मुलींना शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणे अवघड झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारमध्ये विलीनकरणाची आहे. ती बरोबर आहे. पण ही मागणी तुटपुंजा पगार आणि तोही नियमित मिळत नाही यामुळे पुढे आली. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करणे, समान सुविधा देणे आणि वेतनाची हमी देणे असा चांगला प्रस्ताव मांडला तर कर्मचारीही विचार करतील. अजितदादांनी पुढाकार तरी घेतला पाहिजे.

एका प्रश्नाच्या उत्तरात चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीत शिवसेनेला फक्त मुख्यमंत्रिपद हवे आहे व त्या बदल्यात तो पक्ष बाकी सर्व इतरांना सोडायला तयार आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने पंढरपूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला, देगलूर मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यानंतर आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघही काँग्रेसला सोडला आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये सातपैकी पाच निवडणुकांत शिवसेनेचा आमदार निवडून आला होता. तरीही ती जागा काँग्रेसला सोडल्यामुळे कोल्हापूरचे शिवसैनिक हवालदिल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना ही राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हातात गेली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: