Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार – सतेज पाटील

कोल्हापूर  :  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करण्यात येणार असून राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटना व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्व आयोजनाबाबत बैठक व पत्रकार परिषद झाली, यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी ही माहिती दिली. बैठकीस व पत्रकार परिषदेस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संभाजीराजे छत्रपती, जयंत आजगावकर, आमदार पी.एन. पाटील, राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजसिंह चव्हाण, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व रमेश जाधव उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व वर्षभर साजरे करण्यात येणार असून या पर्वात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उपक्रमात नवीन कार्यक्रम राबविण्यात मान्यवर व जनतेकडून आलेल्या नवीन सूचनांचा स्वीकार केला जाईल, असे ते म्हणाले. राज्यात छत्रपती शाहू महाराजांनी ज्या-ज्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत अशा ठिकाणीही कार्यक्रम राबविण्यात येतील. यातील काही कार्यक्रम सांस्कृतिक विभागाकडे दिले जातील.  शाहू मिल व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्मृती- शताब्दी पर्वातील काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतील असे सांगून पालकमंत्री म्हणाले, शाहू मिल स्मृती स्थळ म्हणून विकसित केले जाईल असे ते म्हणाले.

ग्रामविकास मंत्री  मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारा जगातील एकमेव राजा, पुरोगामी विचारांचा जागर करणारे राजा असून राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्वात लोकराजा शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे.  स्मृती-शताब्दी पर्वात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गुणगौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपती महोदयांना देऊन हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येईल.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्वात राज्यातील नामवंत शेतकऱ्यांसाठी ॲग्रीकल्चर कार्यशाळा घेण्यात यावी. दिल्लीतही कार्यक्रम व्हावा, शाहू महारांजानी भेट दिलेल्या ठिकाणी कार्यक्रम व्हावेत, कोल्हापूरला जागतिक स्तरावर पोहोचवावे, शाहू मिल काम आणि शाहू महाराजांनी उभारलेल्या वास्तूंचे संरक्षण, शाहू चरित्रग्रंथ अभ्यासक्रमात समावेश, खासबाग मैदावार महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी स्पर्धाचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती-शताब्दी कृतज्ञता पर्व लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading