आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत पुणे विद्यापीठ प्रथमच विजेते

पुणे – सावात्रिबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या १८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठताना विजेतेपदाला गवसणी घातली. एसएनबीपी संस्थेने पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी संबलपूर विद्यापीठ संघाचा ३-० असा पराभव केला.

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा तालेब शाह पुणे विद्यापीठ संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात तालेबने दुसऱ्या आणि ६०व्या मिनिटाला गोल केला. पुण्याचा तिसरा गोल प्रज्व मोहरकर याने २२व्या मिनिटासला केला. पश्चिम विभागातून राष्ट्रीय स्तरावरील आंतरविद्यापीठ स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा पुणे विद्यापीठाचा संघ हा दुसराच संघ ठरला. यापूर्वी अशी कामगिरी २०१३ मध्ये जवाहरलाल नेहरु पीजी महाविद्यालय भोपाळ संघाने केली होती.

पुणे विद्यापीठ संघाचा आजचा खेळ हा निर्विवाद वर्चस्वाचा होता. त्यांच्या वेग आणि आक्रमणाचा सामना संबलपूर विद्यापीठ संघाच्या खेळाडूंना जमलाच नाही. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला तालेब शाह याने पुणे संघाचे खाते उघडले. प्रज्वल मोहरकरच्या साथीत रचलेली सुरेख चाल त्याने पूर्णत्वाला नेताना संबलपूरचा गोलरक्षक दिलीप एस.ए. याला चकवले. त्यानंतर रोहन पाटिलने डावीकडून सुरेख मुसंडी मारताना संबलपूरच्या गोलकक्षात प्रवेश केला. त्याने दिलेला पास प्रज्वल मोहरकर याने २२व्या मिनिटाला यशस्वी केला. पुणे विद्यापीठ संघाने मंध्यातरालाच २-० अशी आघाडी घेतली.

उत्तरार्धात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या चांगल्या संधी निर्माण केल्या. मात्र, प्रतिस्पर्धी गोलरक्षकांना चकवण्यात त्यांना अपयश आले. सामन्याच्या अगदी अखेरच्या मिनिटाला पुणे विद्यापीठाच्या खेळाडूंनी डावीकडून रचलेल्या चालीवर तालेब शाहने केला. रईस मुजावर याने वेगवान चाल करताना उजव्या बाजूला राहुल शिंगदेला पास दिला. त्यांना चेंडू सुरेख कव्हर करत तालेबला पास दिला आणि त्याने ६०व्या मिनिटाला संबलपूरच्या गोलरक्षकाला चकवले.

दरम्यान, तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात व्हीबीएसपी विद्यापीठ जौनपूर संघाने लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ संघाचा ४-२ असा पराभव केला.

स्पर्धेत ११ गोल करणारा तालेब शाह स्पर्धेचा मानकरी ठरला. त्याला रोख २५ हजार रुपयाचे पारितोषिक मिळाले. स्पर्धेत एकूण पाच विभागात वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. यात प्रत्येकाल रोख पाच हजार रुपये देण्यात आले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण एसएनबीपी समूहाचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. डी. के. भोसले यांच्या हस्ते पार पडला. या वेळी एसएनबीपी समूहाच्या अध्यक्षा आणि जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धा समितीच्या उपाध्यक्ष डॉ. वृषाली भोसले, समूहाच्या संचालिका देवयानी भोसले आणि अॅडव्होकेट रुतुजा भोसले उपस्थित होते. जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धा समितीचे सरचिटणीस कुक्कू वालिया यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: