महाविकास आघाडीचा खरा रंग महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणारच – चित्रा वाघ
पिंपरी : आज राज्यात सर्वत्र धुळवड साजरी केली जात आहे. अनेकजण हा रंगांचा सण आपल्या कुटुंबिय आणि मित्र परिवारांसह साजरा करत आहेत. तर, राज्यात राजकीय धुळवड देखील पाहायला मिळत आहे. आपल्या विरोधकांवर नेते मंडळी विविध मुद्य्यांवरून निशाणा साधत आहेत. दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आज महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
राज्य सरकारला रंगच राहिला नाही, सरड्यासारखे रंग बदलणार हे सरकार आहे. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की तुम्ही कुठल्याही रंगात रंगा पण, आम्ही तुमचा खरा रंग महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणारच.अशी चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये धुळवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी आल्या होत्या. तेव्हा, त्यांच्याशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांना सर्व ठिकाणी लढावे लागते, आज महिला या धुळवडीचा आनंद घेत असून त्यांनी असच आनंदी राहावे.अशी सदिच्छा देखील व्यक्त केली.
