नदी सुधार प्रकल्पामुळे भविष्यात १६ फूट पूर पातळी वाढण्याची शक्यता- सारंग यादवाडकर

पुणे – ठाकरे सराकरने नदी सुधार प्रकल्पाला ब्रेक लावला आहे. त्यावर आज सामाजिक संस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली .सुधार प्रकल्पावर नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची  सुमारे १६ फूट पूर पातळी  भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला सामाजिक संस्थांचे रवींद्र सिन्हा, तन्मयी शिंदे, पुष्कर कुलकर्णी, निरंजन उपासनी उपस्थित होते.
पुण्यात चार पूल पाडण्यात येणार असून ७ पुलांची उंची वाढवावी लागणार आहे. या प्रक्रियेमुळे नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाबरोबर तेथील जैवविविधतेवर परिणाम होईल. तसेच या नद्यांचे रूपांतर कालवे किंवा नाल्यांत होतील, अशी भीती सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

सारंग यादवाडकर म्हणाले, महापालिकेने मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्‍पासाठी करण्यात आलेल्या अभ्यासात अनेक त्रुटी आहेत.यामध्ये पर्यावरण बदलाचा, निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा, पूर परिस्थिती आदी विषयांचा कोणताही शास्त्रीय अभ्यास न केल्याचा आरोप  यादगावकर यांनी केला.
टेरी’ संस्थेद्वारे पुण्यातील पावसाबाबत जाहीर केलेल्या अहवालात भविष्यात ३७.५ टक्के अधिक पर्जन्यमान वाढेल, असे म्हटले आहे. शहरात सुमारे १३२८ दशलक्ष लिटर (एमएलडी) मैलापाणी तयार होते. त्यातील ५०७ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. तर ३९६ एमएलडी पाण्यावर जायका प्रकल्पांतर्गत प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. ९०३ एमएलडी मैलापाण्यावर प्रक्रियेचा प्रस्ताव असून उर्वरित ४२५ एमएलडी मैलापाण्यावर कोणत्याही
प्रकारची प्रक्रिया होणार नसल्याचे यातून दिसून येत आहे. त्यात पूर रेषांचे, नदीकाठी असलेली पाणथळ जागा आदींचा ही विचार केला जात नसल्याचे दिसून येत आहे. नदी पुनरुज्जीवन करणे आवश्‍यक आहे. पण त्यासाठी नदीचे शुद्धीकरण आवश्‍यक आहे सुशोभीकरण नाही. नैसर्गिक पद्धतीने नद्यांचे प्रदूषण कमी करणे, पूररेषेच्या ठिकाणी बांधकाम रोखणे, तसेच जायका प्रकल्पाची क्षमता वाढविण्याची गरज आहे, असे सारंग याडगावकर यांनी सांगितले.
मुळा-मुठा नदी काठ सुधार प्रकल्पावर नुकतीच सामाजिक संस्था आणि महापालिका यांच्‍यात सविस्तर चर्चा झाली. मात्र सामाजिक संस्थांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांवर महापालिकेकडून उत्तर मिळाले नाहीत. त्यामुळे जलसंपदा विभागानंतर दुसऱ्या फेरीची चर्चा झाल्यावर पुढील भूमिका ठरविण्यात येईल.असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

%d bloggers like this: