fbpx
Friday, April 26, 2024
BusinessLatest News

बांधकाम साहित्याच्या वाढत्या दरामुळे क्रेडाई महाराष्ट्र काम बंद ठेवणार- सुनील फुरडे

पुणे : गेल्या काही वर्षांपासून स्टील, सिमेंट व  इतर बांधकाम साहित्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. काही वर्षाच्या तुलनेत आता हे दर गगनाला भिडले असून परिणामी, बांधकाम व्यावसायिकांना घरे बांधणे परवडत नाही त्यामुळे क्रेडाई महाराष्ट चे सर्व सभासद बांधकामे बंद ठेवण्याच्या विचारात आहेत.

फुरडे म्हणाले की, बांधकाम साहित्यापैकी महत्वाचा घटक असणाऱ्या स्टीलचा दर, सिमेंटचा दर, ४ इंच विटांचा दर, वाळू आणि वॉश सॅण्ड, इलेक्ट्रिक वायर, फिटिंग्स, टाईल्स, पाईप, सॅनेटरी वेअर, फॅब्रिकेशन, रेती, गौण खनिज, मुरूम, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मजुरी यात साधारणतः ४० टक्के वाढ झाली आहे.

बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली ही वाढ नैसर्गिक आहे की, साठेबाजीमुळे किंवा नफेखोरीमुळे होत आहे, याची देखील प्रशासनाने व सरकारी यंत्रणांनी पडताळणी करावी. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सामान्य गृह खरेदीदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील फुरडे यांनी पत्रकाद्वारे केली.

याच्या शिवाय, पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर येथील सर्व मालमत्ता खरेदीवर यंदा १ एप्रिलपासून १ टक्के मेट्रो अधिभार पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे.  घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांवर अधिभाराचा थेट परिणाम होणार आहे .परिणामी क्रेडाई- महाराष्टचा या प्रस्तावाला तीव्र विरोध असून सरकारने या निर्णयावर फेरविचार करावा असे आवाहन  फुरडे  यांनी  केले आहे.

वरील बाबींकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राचे सर्व सभासद काम बंद ठेवतील, कारण ह्या वाढलेल्या किंमतींत कच्चामाल खरेदी करून घर बांधणे परवडणारे नाही, अश्या बंद झालेल्या प्रकल्पांची पूर्णत्वाची अंतिम तारीख वाढवून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणा कडे केली जाणार आहे.

उपरोक्त विषयांकडे लक्ष्य वेधण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्र व क्रेडाई पुणे मेट्रो यांनी अनुक्रमे माननीय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित  पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

सातत्याने होणारी कच्च्या मालाच्या किंमतीतील भाववाढ, मेट्रो सेस याचा थेट परिणाम गृह खरेदीदारांवर होणार असून होणारी भाववाढ त्वरित रोकण्या साठी शासनाने योग्य ती कार्यवाही करावी व सर्वसामान्य जनतेस त्याची झळ पोहचणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न हे कधीही प्रत्यक्षात उतरणार नाही व ते कायमच स्वप्नच राहील.

आकडेवारीनुसार, यासंबंधी तपशीलवार माहिती द्यावयाची झाल्यास बांधकाम साहित्यापैकी महत्वाचा घटक असणाऱ्या स्टीलचा दर वर्षभरापूर्वी (प्रती टन) ४२,००० रु. होता. हा आता जवळपास  ८४,९०० रु. इतका झाला आहे. सिमेंटचा (प्रती बॅग) दर २६०रू. इतका खर्च यायचा तो आता ४०० च्या घरात गेला आहे. ४ इंच विटांचा दर प्रती हजार मागे ६,५०० रू. इतका होता तो आता ८,००० रू. झाला आहे. वाळू आणि वॉश सॅण्ड यामध्ये ही अशीच मोठी वाढ दिसून येत आहे. वाळूचा दर (प्रति ब्रास) मागे ६,००० रुपये तो आता ७,५०० एवढा झाला आहे. तर वॉश सॅण्डचे दर सुद्धा (प्रती ब्रास) ३,८०० रुपयांवरून ४,८०० रु जाऊन पोहोचले आहे. बांधकाम साहित्याबरोबरच इलेक्ट्रिक वायर, फिटिंग्स, टाईल्स, पाईप, सॅनेटरी वेअर, फॅब्रिकेशन, रेती, गौण खनिज, मुरूम, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मजुरी यात देखील साधारणतः ४० टक्के वाढ झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading