Movie Review – बच्चन पांडे (Bacchan Pandey)
अभिनेता अक्षय कुमारने मागील काही वर्षात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कोविड काळात अक्षय कुमारचे ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘बेलबॉटम’ हे दोन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले होते. त्यानंतर आता होळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातून बॉलीवूडचा हा खिलाडी पुन्हा एकदा अॅक्शन करताना दिसत आहे. साजिद नादियाडवालची निर्मिती असलेला ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट ‘जिगरहट्टा’ या तामीळ चित्रपटाचा रिमेक आहे.
‘बच्चन पांडे’च्या कथेबद्दल सांगायचे तर हा चित्रपट बच्चन पांडे (अक्षय कुमार) या गँगस्टरच्या आयुष्या भोवती फिरतो. मायरा देवेकर (क्रिती सनॉन) ही एक स्ट्रगलर दिग्दर्शक आहे, काहीतरी वेगळेपण असलेल्या कथेच्या शोधात ती आहे, यादरम्यान तिला उत्तरप्रदेशातील बच्चन पांडे या गँगस्टर बद्दल माहिती समजते आणि टि याच विषयावर चित्रपट बनवायचा निर्णय घेते. बच्चन पांडे हा बघवातील असा गँगस्टर आहे ज्याचा एक डोळा दगडाचा आहे. डोळ्या प्रमाणेच त्यांचे मन देखील दगडाचे झाले आहे. .अतिशय क्रूरकर्मा असलेला बच्चन पांडे कोणालाही जीवे मारताना एक मिनिटंदेखील विचार करत नाही. मायराला बच्चन पांडेवर सिनेमा बनवण्यासाठी त्याच्याबद्दल सगळं काही जाणून घ्यायचे असते. त्यासाठी ती तिचा मित्र विशु (अर्शद वारसी) सोबत बघवा येथे जाते. पुढे नेमकं काय होते हे जाणून घेण्यासाठी चित्रपट बघायला हवा.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर अक्षय कुमारने साकारलेला बच्चन पांडे लक्षात राहणारा असला तरी अॅक्शन की कॉमेडी यात काहीसा गोंधळलेला दिसतो. क्रिती सेनन हिने दिग्दर्शक मायराच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तर अर्शद वारसी तिचा मित्र विशूच्या भूमिकेत परफेक्ट दिसत आहे. गुरुजीच्या भूमिकेत पंकज त्रिपाठीने नेहमीप्रमाणे यदमदार काम केले आहे. संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग, प्रतीक बब्बर यांनीही उत्तम काम केले आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसने साकारलेली सोफी आपला प्रभाव टाकण्यात अपयशी ठरते. एकंदरीत सांगायचे तर फार अपेक्षा न ठेवता एकदा ‘बच्चन पांडे’ ला मोठ्या पडद्यावर भेटायला हरकत नाही.
चित्रपट – बच्चन पांडे
निर्माता – साजिद नादियाडवाला
दिग्दर्शक – फरहद सामजी
कलाकार – अक्षय कुमार, क्रिती सेनन, अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, प्रतीक बब्बर, अभिमन्यु सिंह
रेटिंग – **
– भूपाल पंडित