संपूर्ण स्वातंत्र्याकडे जाताना स्वावलंबी भारतात रोजगाराच्या संधी वाढणे आवश्यक – नानासाहेब जाधव

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य मिळविण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी उद्योग, पत्रकारिता, साहित्य, कला आदि माध्यमांतून लाखो भारतीयांनी तसेच महिलांनी योगदान दिले आहे. ते समाजापर्यंत पोहोचविण्याबरोबरच भारत सशक्त स्वावलंबी करण्याचा संकल्प रा.स्व. संघाने केला आहे. त्यासाठी सर्व सज्जनशक्ती एकवटून विविध संस्था संघटनांना सोबत घेण्याचे कार्य संपूर्ण देशभर रा.स्व. संघ करीत आहे, अशी माहिती रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नुकतीच कर्णावती ( अहमदाबाद) येथे रा.स्व. संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा झाली त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेस प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव आणि पुणे महानगर कार्यवाह महेश करपे उपस्थित होते.

प्रांत संघचालक नानासाहेब जाधव पुढे म्हणाले की , कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असतानाच संघाचेही काम २०२० च्या तुलनेत जवळपास ९८ % ठिकाणी पूर्ववत सुरु झाले आहे. शाखांपैकी ६१ % शाखा विद्यार्थ्यांच्या तर ३९ % शाखा तरुण व्यावसायिकांच्या आहेत. दरवर्षी एक ते सव्वा लाख तरुण Join RSS च्या माध्यमातून संघाशी जोडले जातात.

या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ( स्वराज्य ७५ ) स्वातंत्र्य लढ्यातील आध्यात्मिक, सांस्कृतिक, कला, साहित्य, शिक्षण, उद्योग, पत्रकारिता, आदिवासी, महिला, शेतकरी, कामगार अशा सर्वच घटकांचा सक्रीय सहभाग हा समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तोच सामाजिक राष्ट्रीय एकात्मता आणि स्वत्वाचा भाव सर्वदूर सुदृढ करण्याचे प्रयत्न रा.स्व. संघ करीत आहे. या सोबतच स्वावलंबी भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी पर्यावरणानुकुल, श्रमप्रधान, ग्रामीण आणि लघु उद्योगावर आधारित आधुनिक तंत्रांसह पारंपारिक कलांचा विकास करावा लागेल. त्यासोबतच सूक्ष्म वित्त संस्था, कुटीरोद्योग, बचत गट आदिंना विचारात घेऊन मनुष्यबळ कौशल्य प्रशिक्षण आणि संशोधनास चालना देणारे अर्थ व्यवस्थेचे भारतीय प्रतिमान ( MODEL) सिद्ध करावे लागेल. असा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत पारित करण्यात आला. अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: