समृद्ध आणि संस्कारी समाज घडविण्यात शिक्षक हा महत्त्वाचा घटक – डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे : आजच्या बिघडलेल्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये राजकारण्यांवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. समाज योग्य मार्गदर्शनासाठी आजही शिक्षकांकडे पाहतो आहे. समृद्ध आणि संस्कारी समाज घडविण्यात शिक्षक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी पुणे शहर, माध्यमिक शिक्षक संघ पुणे शहर, पुणे शहर प्राथमिक, उच्च माध्यमिक, विनाअनुदानित शिक्षक लोकशाही आघाडी यांच्यातर्फे शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शिक्षिकांना राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार आणि आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान तसेच प्रा.संतोष थोरात व डाॅ. संदिप गाडेकर लिखित इंग्रजी पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन पत्रकार भवन येथे करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी चे कार्याध्यक्ष जी.के.थोरात, के.सी.ढोमसे, वसंतराव ताकवले, राजेंद्र बरकडे, हनुमंत भोसले, शिवाजीराव कामथे , स्वाती भावे, महिला गृह उद्योग लिज्जत पापड उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कोते आदी यावेळी उपस्थित होते. प्राचार्य शिवाजीराव कामथे , प्रा. सचिन दुर्गाडे, डॉ.उज्वला हातागळे, अशोक धालगडे , प्राचार्य अविनाश ताकवले, स्वाती लिम्हण, प्राचार्य संजीव यादव आदिंनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, केवळ राजकारण्यांच्या पुढे पुढे करून वैयक्तिक स्वार्थ साधणाऱ्या शिक्षकांमुळे शिक्षण व्यवस्था बदनाम झाली आहे. शिक्षकांनी स्वार्थाच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणे गरजेचे आहे. शिक्षक केवळ एक विद्यार्थी घडवत नसतात तर त्यातून भविष्यातील समाज घडत असते. शिक्षक हे कायम मार्गदर्शनाचे काम करत असतात.
जी. के. थोरात म्हणाले, शिक्षणामध्ये राजकारण शिरल्यामुळे शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शिक्षक भरडले गेले आहेत. शिक्षकांसाठी ही संघटना लढत आहे. या संघटनेला शिक्षकांनी बळ दिले पाहिजे.
डॉ.उमेश प्रधान म्हणाले, लोकशाही ही केवळ समाजामध्येच नव्हे तर शिक्षण व्यवस्थेमध्ये ही टिकून ठेवली पाहिजे. आज शिक्षणामध्ये लोकशाहीकरण करण्याची गरज आहे. शिक्षण हे शिक्षक केंद्रीय न होता ते विद्यार्थी केंद्रित झाले पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने समृद्ध आणि संस्कारी समाज घडवू शकतो.