कविता अंतर्मनातून स्फुरत असल्याने कवींच्या सहवासात जीवंतपणा जाणवतो : भारत सासणे
पुणे : अनुनय आणि उपासना या दोन्ही गोष्टींनी कवितादेवी प्रसन्न होते. पण अनुनय करणार्याकडे ती टिकत नाही तर उपासना करणार्या कवीकडे चिरंतन राहते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कथाकार आणि 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. कविता ही अंतर्मनातून स्फुरत असल्याने कवींच्या सहवासात जीवंतपणा जाणवतो, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कवयित्री प्रभा सोनवणे यांना ‘काव्यजीवन गौरव पुरस्कार’ सासणे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर व्यासपीठावर होते. सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रभा सोनवणे यांच्या बद्दल बोलताना सासणे म्हणाले, कवी कधीच निवृत्त होत नाही, तो शेवटच्या श्वासापर्यंत लिहिता असतो. सोनवणे यांनी त्यांच्या मंतरलेल्या दिवसांबद्दल प्रदीर्घ लेखन करावे त्यातही काव्यात्मकता येईल असे सांगून गझलचा अभ्यास करावा, अशी सूचनाही केली.
आवडत्या लेखकाच्या हस्ते मिळालेल्या या पुरस्काराने मला पद्मश्री मिळाल्याचा आनंद आहे, असे मत सोनवणे यांनी व्यक्त केले. तोच धागा पकडून सासणे म्हणाले, पुरस्कारप्राप्त व्यक्ती आणि पुरस्कार देणार्या व्यक्तीसाठी हा क्षण आनंददायक असतो. कवींबरोबर असताना मलाही पद्मश्री मिळाली आहे, असे मी समजतो. पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना प्रकट करताना सोनवणे म्हणाल्या, वयाच्या 13व्या वर्षापासून 65व्या वर्षापर्यंत लिहिलेल्या कवितांचा हा सन्मान आहे. आनंदाच्या अत्युच्च क्षणी निवृत्तीची भावना मनात येते. कवितेची वाट बिकटच होती परंतु घरच्यांची खंबीर साथ मिळाल्यामुळे मी लिहिती राहिले. कवितेने अखेरपर्यंत साथ द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली.
स्वागत आणि प्रास्ताविक अॅड. प्रमोद आडकर यांनी केले. मैथिली आडकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन रंगले. यात पत्रकार स्वप्निल पोरे, अपर्णा डोळे, प्राजक्ता वेदपाठक, दयानंद घोटकर, कविता क्षीरसागर, मीरा शिंदे, स्वाती सामक, निरूपमा महाजन, चिन्मयी चिटणीस, डॉ. ज्योती रहाळकर यांचा सहभाग होता. प्रभा सोनवणे यांच्या सादरीकरणाने कविसंमेलनाचा समारोप झाला.