कथक नृत्यातून दिग्गजांना आदरांजली
पुणे ः स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष, महिला दिन अशा अनेक गोष्टींच्या निमित्ताने नृत्यवेध कथक नृत्य संस्थेच्या संस्थापिका डॉ. माधुरी आपटे आणि संस्थेच्या विद्यार्थिनी ‘कथक नृत्य भावांजली’ हा बहारदार कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमामध्ये सरस्वती वंदना, ताल झपताल, तराणा, दशावतार या कथक नृत्याधारित रचनांबरोबरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेली आणि लतादीदींचा स्वर्गीय स्वर लाभलेली शिवाजी महाराजांची आरती, तसेच भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या भावपूर्ण स्वरातील नामदेव महाराजांचा अभंग, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची शिवाजी महाराजांवरील कविता, तसेच श्री. विलास पोतनीस रचित गणिताधारित काही नृत्य संरचना सादर करण्यात आल्या.
या कार्यक्रमात डॉ. माधुरी आपटे, विभावरी परचुरे, कल्याणी देशमुख , खुशबू जाधव , वैदेही खलाडकर, मधुरा झांबरे, श्रध्दा लघाटे, रोमली शुक्ला, रूचा लिमये, वैदेही कवठेकर, अवंती पोतनीस , अहाना काळे, श्रव्या दाबक, अनुश्री पोतनीस, मिहीका महाडीक, श्रेया हलदुले यांनी कथक नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.निवेदन सुप्रिया चित्राव यांनी केले.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘भावांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार,१२ मार्च रोजी करण्यात आले होते. भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्व कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरी देऊन सत्कार करण्यात आला .
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ११२ वा कार्यक्रम होता.