मुलानी आय केअर सेंटरच्या वतीने काचबिंदू जागृतीसाठी सायकल रॅली

पुणे : जागतिक काचबिंदू सप्ताहाचे (दि. ६ मार्च ते १२ मार्च २०२२) औचित्य साधून पुण्यातील मुलानी आय केअर सेंटरच्या वतीने काचबिंदू जागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. एमजी रस्ता, कॅम्प, आंबेडकर, पूना लेडीज क्लब, पुलगेट आदी भागात ही सायकल रॅली काढण्यात आली. मुलानी आय केअर सेंटरचे डॉक्टर्स, कर्मचारी, स्वयंसेवक, विद्यार्थी, तसेच लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जवळपास ६० सायकलस्वारांनी काचबिंदूबाबत जागृतीपर घोषणा देत, पॅम्प्लेट वाटत नियमित डोळ्यांची तपासणी करण्याचे आवाहन केले. तसेच मुलानी आय केअर सेंटरतर्फे १३ मार्च २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वेळेत एमजी रस्त्यावरील सेंटरमध्ये आयोजिलेल्या मोफत काचबिंदू तपासणी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले.

सेंटरच्या प्रमुख आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. समिता मूलानी-कटारा यांच्या नेतृत्वात ही सायकल रॅली काढण्यात आली. त्या म्हणाल्या, “यंदा ६ ते १२ मार्च या कालावधीत जागतिक काचबिंदू सप्ताह राबविण्यात आला. मूलानी आय केअर सेंटरच्या वतीने काचबिंदू तपासणी आणि जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली. आज काचबिंदूमुळे अनेक लोकांना अंधत्व आले आहे. भारतात कोट्यवधी लोक काचबिंदूने ग्रासलेले आहेत. पण योग्य काळजी आणि उपचार घेतले तर काचबिंदूसारख्या आजारांना आपण दूर ठेवू शकतो. काचबिंदूची तपासणी नेत्ररोग तज्ज्ञांच्या निगराणीखाली व्हायला हवी.”

Leave a Reply

%d bloggers like this: