समाजसेविकांचे कार्य देश महासत्ता होण्यास करेल मदत – उद्योजिका डॉ. पूर्वा केसकर

पुणे : छोट्या छोट्या वाटेतून पाणी येते आणि त्याची मोठी नदी होते. मग ती नदी समुद्राला जाऊन मिळते. तसेच वेगवेगळ्या पातळीवर काम करणा-या महिलांचे काम एकत्र आले तर त्याचे रूप एका मोठ्या नदीसारखे दिसते. ती नदी सागराला म्हणजे आपल्या देशाला मिळणार आहे. त्यांच्या या कामामुळे देश महासत्ता होण्यास मदत होईल, असे मत उद्योजिका डॉ. पूर्वा केसकर यांनी व्यक्त केले.

महा एनजीओ फेडरेशनच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री सन्मान पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. सहकारनगर येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालनात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा, प्रणिता जगताप, भाग्यश्री साठे, मुकुंद शिंदे, अमोल उंबरजे, अक्षय महाराज भोसले, राहुल पाटील, गणेश बाकले, ललित वाघ आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्त्या नीता मगर, मोनिका शिंपी, संध्या भोयर, मंगल नागूल, छाया खाजेकर, माधुरी चव्हाण, सविता दरंदले, राजश्री दळवी, ज्योती कापसे, नेहा लद्दड, दीपाली निखळ यांसह नायडू हॉस्पिटलमधील परिचारिका छाया जगताप या विविध क्षेत्रात काम करणा-या महाराष्ट्रातील १२ महिलांचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह व पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ.पूर्वा केसकर म्हणाल्या, लिंगभेद करण्यापेक्षा पहिल्यांदा माणूस म्हणून विचार केला पाहिजे. माणूस म्हणून आपण दुस-याकडे कसे बघतो, त्याला कसे वागवितो याचा विचार केला पाहिजे. तुम्ही थकू नका, तुमच्याबरोबर कोणी नसले तरी तुमची आत्मशक्ती जागृत ठेवली तर शंभर लोकांचे बळ तुमच्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शेखर मुंदडा म्हणाले, समाजात तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन अनेक महिला काम करीत असतात. परंतु त्यातील प्रत्येकालाच व्यासपीठ मिळते असे नाही. असे काम करणा-या महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व त्यांची प्रेरणा इतरांना मिळण्यासाठी फेडरेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त त्यांना पुरस्कार देण्यात येतो. आपण महिला दिन साजरा करतो, परंतु ख-या अर्थाने आपण त्यांना समान हक्क देतो का? याचा विचार देखील केला पाहिजे. सुरुवात आपल्या घरापासून केली तर आपण घरातल्या महिलांना अनेक कामात, वागणुकीत गृहीत धरलेले असते. त्यामुळे महिलांना सन्मान देण्याचे काम आपल्या घरापासून सुरू केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

गणेश बाकले यांनी सूत्रसंचालन केले. प्रणिता जगताप यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: