Friday, June 5, 2026
Latest NewsSports

खेळाडूंची आठवण होणे हे ही क्रीडा संस्कृतीचाच भाग – रेखा भिडे

पुणे – कुटुंबियाचे प्रोत्साहन तर असतेच. पण, तुमच्यासारखे चाहते आणि संघटक आमच्या सारख्या जुन्या खेळाडूंची आठवण ठेवतात.त्याचवेळी उदयोन्मुख खेळाडूंचाही सन्मान करतात याला क्रीडा संस्कृती नाही, तर काय म्हणायचे असे प्रतिपादन माजी ऑलिंपियन आणि भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधार रेखा भिडे यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संवाद पुणे, सोहन मंगल फौंडेशन, कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘क्रीडा राज्ञी’ पुरस्तकार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. बालगंधर्व रंगमंदिरात रंगलेल्या या सोहळ्यात सीजीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे यांच्या हस्ते माजी ऑलिंपियन आणि भारतीय महिला हॉकी कर्णधार रेखा भिडे-मुंडफण यांना ‘जीवन गौरव’ देऊन गौरविण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना त्या पुढे म्हणाल्या, खेळाडूंची आठवण ठेवली जाते हेच आम्हा खेळाडूंसाठी खूप महत्वाचे आहे. आमच्या वेळे असे सोहळे होत नव्हते, पाठिंबा मिळत नव्हता. आमच्या काळात तर खेळात कारकिर्द घडवायची म्हटले की घरातूनच विरोध होत होता. पण, मी यात भाग्यवान ठरले. घरातून पूर्ण पाठिंबा मिळाला म्हणून मी घडले आणि आज इथे तुमच्यासमोर उभी राहू शकले. खेळाडूंची आठवण ठेवून होणारे असे सोहळे नक्कीच उद्याच्या खेळाडूंसाठी प्रेरक ठरतील.

रेखा भिडे यांनी या वेळी त्यांच्या आणि आजच्या काळातील फरकही विषद केला. आज क्रीडा व्यवस्थापन वेगळे महत्व मिळवून आहे. आमच्या वेळे असे काहीच नव्हते. एक प्रशिक्षक सोडले तर आम्हाला काहीच सुविधा मिळायच्या नाहीत. डॉक्टर अभावाने बघायला मिळायचा, त्यामुळे फिजिओचा प्रश्नच येत नाही. पण,आज हॉकीचा विचार केला तर त्यातील प्रत्येक कौशल्याचे वेगळे प्रशिक्षक, व्हिडिओ अॅनालिस्ट, फिजिओ, डॉक्टर अशा सर्व सुविधा सहज उपलब्ध होतात. अर्थात, आम्ही तक्रार केली नाही. हा बदलत्या काळाचा फरक आहे, असे त्या म्हणाल्या.

खेळाडूला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कुटुंबिय आणि प्रशिक्षकांचा कधीच विचार होत नाही. त्यामुळे खेळाडूच्या प्रवासात त्यांना पाठिंबा देणाऱ्या यंत्रणा उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यासाठी संस्थांनी पुढे यायला हवे. हा सोहळा त्याचे उत्तम उदाहरण आहे. यशाला नेहमीच वाली असतो, अपयशाला कुणीच वाली नसतो. आणि खेळाडूला पहिल्या प्रयत्नांत कधीच यश मिळत नाही. ते अपयश विसरून पुन्हा यशस्वी होण्यासाठी सराव करत असतात अशा वेळी त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज असते आणि ती यंत्रणा अधिक सशक्त असेल तर खेळाडू आत्मविश्वासाने उभा राहिल, असे परखड मत वैशाली पतंगे यांनी मांडले.

या वेळी स्पोर्टस इंडि या संस्थेच्या सुप्रिया बडवे, महाराष्ट्रीय मंडळाच्या नेहा दामले, कोहिनूर समूहाचे कृष्णकुमार गोयल, सोहन मंगल फौंडेशनचे अशोक गुंदेचा, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे सचिन ईटकर, संजीव शहा आदि उपस्थित होते. संवाद पुणेचे संस्थापक सुनील महाजन यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यात माजी ऑलिंपियन आणि महिला हॉकी संघाच्या कर्णधार रेखा भिडे यांचा सीजीएसटी अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते देविका वैद्य (क्रिकेटपटू), साध्वी धुरी (जलतरणपटू), आदिती डोंगरे (सायकलपटू), प्रगती गायकवाड (कुस्तीपटू), रिया तावरी (जलतरण), कोमल दारवटकर (खो-खो), पूर्वी गांजवे (युद्धकला निपुण), समृद्धी कुलकर्णी (मॅरेथॉन धावपटू), मनाली देव (आंतरराष्ट्रीययोग प्रशिक्षक), सुवर्णा पाठक देवळाणकर (पीएचडी), विद्या पाठारे-हनवंते (पीएच डी), प्रतिभा चंद्रन (महिला पत्रकार) यांना गौरविण्यात आले.

आगळ्या पद्धतीने झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात ठराविक अंतराने करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने आगळे रंग भरले. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम पायलवृंदच्या विद्यार्थ्यांनी केले. या सोहळ्यातील नृत्यदिग्दर्शन  निकिता मोघे यांनी केले होते. गणेश वंदन आणि दुर्गा स्तुतीने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात झाली. गायिका उर्मिला नेने यांनी एकाचवेळी पुरुष आणि महिला आवाजात गाणे गाऊन प्रेक्षकांकडून खास दाद मिळवली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading