स्त्री-पुरुष भेदभावरहित सामाजिक संरचना येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक- अतुलचंद्र कुलकर्णी

पुणे,: स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता योग्य समन्वय राखल्यास चांगला समाज घडण्यास मदत होईल तसेच अशा प्रकारची भेदभावरहित सामाजिक संरचना येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक व अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘महिला लैंगिक अत्याचार कायदा व लैंगिक संवेदना’या विषयावर कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक व अपर पोलीस महासंचालक कार्यालयात कार्यशाळा आयोजित केली होती, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ, संशोधन अधिकारी डॉ.हेमंतकुमार पवार, उपअधीक्षक प्रदीप जगताप, राजाराम भोसले, कारागृह अधिकारी शिवाजी पाटील, महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्या डॉ. अजंली देशपांडे, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकारी अश्विनी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

स्त्री जन्माचे स्वागत करण्याची मानसिकता समाजात रुजत असल्याची बाब स्वागतार्ह आहे असे सांगून  कुलकर्णी म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात स्त्री- पुरुष भेदभाव होणार नाही असा समाज आपल्याला घडवायचा आहे. त्यातूनच पुढील पिढीवर महिलांप्रती आदर राखण्याचे संस्कार घडतील.

डॉ. देशपांडे म्हणाल्या, पोलीसांची ‘मदतनीस’ म्हणून भूमिका असावी यासाठी विशाखा समिती स्थापना करण्यात आलेली आहे. महिलांवर अत्याचार झाल्यास स्वतः महिला तसेच इतर कोणतीही व्यक्तीला तक्रार दाखल करता येते. अन्यायाविरोधात धैर्याने आवाज उठवल्यास भविष्यात अशा घटनांना आळा बसू शकेल.

त्या पुढे म्हणाल्या, महिलांकडे सृजनांची शक्ती आहे. समाज निर्मितीतील महत्वपूर्ण सहभागामुळे तिला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. स्त्री आणि पुरुष समसमान व परस्परपूरक असून भेदभाव न करता तिच्या क्षमतेचा उपयोग करुन घेतला पाहिजे. कोणताही निर्णय घेतांना महिलांचे मत विचारत घेतले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

कुलकर्णी म्हणाल्या, समाजात काम करताना महिला म्हणून नव्हे तर समाजाचा घटक म्हणून स्त्री-पुरुष समानतेबाबत मत व्यक्त करावे. कारागृह विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगी दक्षता, चातुर्य, हजरजबाबीपणा, कार्यतत्परता इत्यादी गुण असणे आवश्यक आहे.

यावेळी महानिरीक्षक  कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तुळशीचे रोपटे देवून स्वागत केले. महिला दिनाचे औचित्य साधत आजपासून नियत्रंण कक्षाची जबाबदारी कांचन शेलार व दिक्षीता चिलप यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: