Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

उलगडला अनवट वाटा चोखंदळणाऱ्या महिलांचा प्रवास

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त हिंदू महिला सभा, पुणे यांच्यावतीने आयोजित ‘अनवट वाटेवरच्या आम्ही’ या कार्यक्रमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा कार्यपट उलगडला. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले यांनी वृद्ध कल्याण शास्र तज्ज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन, योग थेरपिस्ट डॉ. अनुराधा ओक, भिक्षेकरूंच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या डॉ. मनीषा सोनवणे आणि करोनायोद्धा डॉ. दीप्ती बच्छाव यांच्याशी संवाद साधला. यावेळी हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले, वंदना जोगळेकर, सुनिता अभ्यंकर, स्मिता नातू आणि कार्यकारिणी मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.

वृद्ध कल्याण शास्र तज्ज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी वृद्धत्व व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे हे यावेळी सांगितले. त्या म्हणाल्या, वृद्धांना समजून घेऊन त्यांची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. वयोपरत्वे त्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यासाठी कुटुंबीय आणि समाजाने काम करणे गरजेचे आहे. वय वाढल्यानंतर व्यक्तीच्या जगण्यातील गुणवत्ता कमी होत जाते. अशावेळी त्यांचे जीवन सुखकर कसे होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

यानंतर योग थेरपिस्ट अनुराधा ओक यांनी योगोपचार म्हणजे काय हे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, व्यस्त झालेल्या शरीराला स्वस्थ बनविण्यासाठी उपचार म्हणजे योगोपचार असतो. स्रियांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. बहुतांश स्रिया आरोग्याकडे दुर्लक्ष करून स्वत्व कशा हरवून बसतात हेदेखील त्यांनी काही उदाहरणांमधून सांगितले. स्री आरोग्याचे महत्त्व जाणून सुरू केलेल्या आपल्या संस्थेबद्दलही त्यांनी यावेळी माहिती दिली.

भिक्षेकरुंच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या डॉ. मनीषा सोनवणे आणि त्यांचे पती डॉ. अभिजीत सोनवणे या दाम्पत्याचे कार्य ऐकून उपस्थित भारावले. डॉ. सोनवणे म्हणाल्या, भिक्षेकरुंसाठी काम करणे गरजेचे आहे या विचाराने आम्ही सुरुवात झाली आणि त्यांच्या अडचणी दिसू लागल्या. त्यांना केवळ वैद्यकीय मदत न देता त्यांच्या हाताला काम द्यावे या उद्देशाने त्यांचे समुपदेशन केले आणि भीक न मागता काम करून स्वकमाईवर उदरनिर्वाह करण्याचे मार्गदर्शन केले. भिक्षेकरी ते कष्टकरी आणि अन्नपूर्णा प्रकल्प याद्वारे रोज १००० गरजु लोकांना अन्नदान आणि १५६ भिक्षेकऱ्यांना काम मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

मानसिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी कोविड सेंटर चालवणाऱ्या डॉ. दीप्ती बच्छाव यांचे कार्यही असेच कौतुकास्पद आहे. डॉ. बच्छाव म्हणाल्या, माझा मुलगा ऑटिस्टिक असल्याने मानसिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा त्रास, त्यांच्या वेदना जाणून होते. कोविड काळात या व्यक्तींची काळजी घेणे विशेष होते. त्यामुळे मी या लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. काळ कठीण होता परंतु, विश्वासाने काम करून या सगळ्यांची सेवा आम्ही केली.

कार्यक्रमाचे निवेदन वंदना जोगळेकर यांनी केले. आभार सुप्रिया दामले यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading