‘त्या’ एका क्षणाने माझे आयुष्य बदलून टाकले – महेश भट्ट

पुणे : यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही मला शून्यतेची जाणीव झाली आणि मला दारूचे व्यसन लागले. पण एके दिवशी माझी दुसरी मुलगी शाहीनचा जन्म झाला तेव्हा मी दारू पिऊन घरी परतलो. मी माझ्या मुलीला हातात घेतले, पण माझ्या तोंडाला वास येत होता. त्यामुळे मुलीला माझ्या हातातून परत घेतले गेले. त्या एका क्षणाने माझे आयुष्य बदलून टाकले. तेव्हापासून 34 वर्षे झाली, मी दारू पिली नाही. वेदनेतूनच मोती चमकतो असा भावयास्पर्शी अनुभव दिग्दर्शक महेश भट्ट यांनी व्यक्त केला.   

निमित्त होते पुणे स्थित “समर्पण” या व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राच्या शुभारंभ सोहळ्याचे. यावेळी महेश भट्ट, अभिनेत्री पूजा भट्ट व बलदोटा ग्रुपचे सीएमडी नरेंद्र ए. बलदोटा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान मार्टिन पीटर्स यांनी उपस्थितांना जागतिक दर्जाच्या पुनर्वसन कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. या 28 दिवसांच्या कार्यक्रमात अमली पदार्थांच्या व्यसनाधीनांना पुण्यातील या पुनर्वसन केंद्रात राहावे लागणार असून त्यांच्यावर जागतिक स्तरावर उपचार केले जाणार आहेत. 

यावेळी महेश भट्ट म्हणाले, ‘डॅडी’ या चित्रपटाचे शूटिंग करत असताना एकदा मला वाटले की दारू प्यावी, कोणाला कळणार नाही. पण तेवढ्यात आतून आवाज आला की तू जगाशी, त्या लहान मुलीशी खोटं बोलशील, पण स्वत:शी खोटं कसं बोलणार. म्हणून, दारूपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला स्वत:च पावले उचलावी लागतील. ‘समर्पण’चे राहुल बाजपेयी यांनी मला आणि पूजाला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले कारण आम्ही सेलिब्रिटी आहोत म्हणून नाही तर आम्हाला दारूचे वाईट सवय लागली होती, त्यातून आम्ही सुटलो म्हणून.  

पूजा भट्ट म्हणाली की, “साधारणपणे लोक माझी ओळख एक अभिनेत्री, चित्रपट निर्माता म्हणून करून देतात. पण मला असे म्हणायचे आहे की पूजा भट्ट दारूच्या व्यसनातून सावरली आहे असे लोकांनी म्हणावे. मला दारू पिण्याचे व्यसन होते. पण वडील महेश भट्ट यांच्या एका मोबाईल मेसेजने माझे आयुष्य बदलून टाकले. भट्ट साहेबांनी त्यात लिहिले होते की, ‘तू माझ्यावर प्रेम करतेस तर तू स्वतःवर प्रेम करतेस. कारण मी तुझ्यात राहतो’, त्या दिवशी मी भावूक झाले आणि दारू सोडली. मी मद्यपान सोडले आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. हे सांगताना पूजा भट्ट खूपच भावूक झाली.

ती पुढे म्हणाली की,  कोविडचा काळ सुरू होता, त्याचवेळी मारहाण, एकमेकांचा अपमान, मानसिक स्वास्थ्य, नैराश्य, आत्महत्या अशा घटनांमध्ये वाढ झाली होती. सुशांत सिंग राजपूतचे प्रकरण ज्या पद्धतीने दाखवले गेले, त्यावरून लोक घाबरले. दारूची सवय हा खरे तर एक आजार आहे. त्याचा इतर आजारांप्रमाणे उपचार केले पाहिजेत.

Leave a Reply

%d bloggers like this: