Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करू नये अन्यथा शिवप्रेमी येत्या काळात भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही – प्रशांत जगताप

पुणे: गेल्या ५ वर्षांत पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपला शहरात विकासकामे करता आली नाहीत. रस्ते, आरोग्य, दळणवळण अशा सर्वच बाबतीत पुणे शहराच्या विकासाचे चाक भाजपने उलट्या दिशेला फिरवले. विकासाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे पुणेकरांच्या लक्षात आले, येत्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुण्यात औषधालाही उरणार नाही याचा अंदाज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आला. आता सत्ता राखायची म्हणजे जनतेला कोणत्यातरी भावनिक मुद्य्यांत गुंतवलं पाहिजे हा डाव टाकणे ही भाजपची नेहमीची खेळी. यासाठी पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

कधी नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना असो, महाराजांचा पुतळा हटवणे असो कधी छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड असो अशा विविध माध्यमांतून छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत अवमान करण्याचा भाजप व त्यांच्या मातृ संघटनेचा प्रयत्न असतो. मात्र सत्ता जाण्याची शक्यता दिसताच मतांच्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ स्वार्थासाठी भाजपने वापर केला.

पुण्यातही केवळ राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचे नियोजन करण्यात आले. नरेंद्र मोदी ६ मार्च रोजी पुण्यात येणार म्हणून पूर्ण तयारी झालेली नसतानाही अनावरण करण्यात आले. याचाच परिणाम म्हणून उदघाटनाच्या दुसऱ्याच दिवशी येथील मेघडंबरीचा काही भाग गळून पडला.

शिवप्रेमी म्हणून, छत्रपतींचे मावळे म्हणून आम्ही या घटनेची माहिती घेतली असता स्मारकाचे केलेले काम पक्के होण्यासाठी किमान २१ दिवसांच्या कालावधीची गरज असताना नरेंद्र मोदींच्या सोयीसाठी केवळ ७ व्या दिवशी उदघाटनाचे आयोजन करण्यात आले. जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जेथे त्यांचे बालपण गेले, जेथे त्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे स्वप्न रुजले त्या पुण्यभूमीत नरेंद्र मोदींच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची अवहेलना होणे यासारखे मोठे दुर्दैव नाही. स्वराज्यातील मावळे म्हणून आमची भाजपला एकच विनंती आहे कि तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करता येत नसेल तर किमान अवमान करू नये. अन्यथा महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी येत्या काळात भारतीय जनता पक्षाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading