Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन – जिल्हा संघाला विजेतेपदाचा मुकुट

१९ वर्षांखालील मुले : केडन्सचा आर्शीन कुलकर्णी सर्वोत्तम खेळाडू

पुणे : सुपर ओव्हर पर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये जिल्हा संघाने २२ यार्ड्स संघाला पराभूत करताना इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत जिल्हा संघाने प्रथम फलंदाजी करताना ४९.२ षटकांत सर्वबाद २१८ धावांपर्यंत मजल मारली. देव नवले व सचिन धस यांनी शानदार फलंदाजी करताना संघाला ही धावसंख्या उभारून दिली. देव नवलेने ६४ चेंडूत ९ चौकारांच्या साह्याने ६७ तर सचिन धसने ७६ चेंडूत ७ चौकार व एका षटकाराच्या सहाय्याने ५२ धावांची खेळी केली. अभिषेक पवारने २९ (४ चौकार, १ षटकार) तर शर्विन उदयने २३ (३ चौकार, १ षटकार) धावा केल्या. रितेश तिडकेने २ तर अथर्व शिंदे, हर्षवर्धन पाटील, गौरव कुमार, रोशन वाघसरे व श्रेयस केळकरने प्रत्येकी १ गडी बाद केला.

२२ यार्ड्स संघाने निर्धारित ५० षटकांत ९ बाद २१८ धावा केल्या. यामध्ये प्रसाद देशमुखने ८८ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने ६६ धावांची निर्णायक खेळी केली. त्याला अथर्व शिंदेने ४५ (२ चौकार) तर मल्हार शेंबाडकरने ४३ (६ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. सौरभ शिंदे, अभिषेक निषाद व ओंकार पटकल यांनी प्रत्येकी २ तर ऋषिकेश कातकडे  व शिवराज शेळकेने प्रत्येकी १ गडी बाद केला.

सुपर ओव्हरमध्ये २२ यार्ड्स संघाने १ षटकांत १बाद १२ धावा केल्या. यात रितेश तिडकेने ७ (१ चौकार) तर श्रेयस केळकरने ५ (१ चौकार) धावा केल्या. अभिषेक निषादने १ गडी बाद केला. जिल्हा संघाने एका षटकात नाबाद १६ धावा करताना विजय साकारला. यात अभिषेक पवारने ११ (१ चौकार व १ षटकार) तर सचिन धसने ५ (१ चौकार) धावा करताना विजय पटकावला.

केडन्स संघाच्या आर्शीन कुलकर्णी याला ‘सर्वोत्तम खेळाडू’ व ‘सर्वोत्तम फलंदाज’, २२ यार्ड्सच्या हर्षवर्धन पाटीलला ‘सर्वोत्तम गोलंदाज’ तर जिल्हा संघाच्या अभिषेक पवारला ‘सर्वोत्तम यष्टीरक्षक’ पुरस्कारानेसन्मानित करण्यात आले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे शुभेंद्र भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीएचे सहसचिव राहुल ढोले पाटील, लॉयन्स क्लबचे हेमंत नाईक, मित्तल ब्रादर्सचे संचालक पवन मित्तल, शिवप्रसाद गौरकर, पानासोनिकचे प्रभाग व्यवस्थापक राजेश सिंग, इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष दर्शन जिंदल, सचिव सनय सेनगुप्ता, संचालक महेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading