शिवजयंती निमित्त पीएमपीच्या पुणे स्टेशन आगारात रक्तदान शिबिर
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे स्टेशन आगारामध्ये हडपसर येथील अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये पुणे स्टेशन आगारातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिरात एकूण ५७ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे यांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी पुणे स्टेशन आगार व्यवस्थापक संजय कुसाळकर, आगार अभियंता विकास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
दत्तात्रय झेंडे व चंद्रकांत वरपे यांच्या हस्ते पुणे स्टेशन आगारातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५ चालक, ५ वाहक व वर्कशॉप विभागातील २ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदात्यांचा देखील सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पुणे स्टेशन आगारातील चालक दिपक तेली यांचा मुलगा कृष्णा दिपक तेली याने औरंगाबाद येथे झालेल्या ३९ व्या स्टेट रोलर रिले स्केटींग चॅम्पियनशिप मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल गौरवचिन्ह देऊन त्याचाही सत्कार करण्यात आला.
