२४ व्या कलाश्री महोत्सवात शर्वरी जमेनीस यांचा नृत्याविष्कार
महोत्सवाची सुरुवात किराणा घराण्याचे गायक पं. सुधाकर चव्हाण यांच्या गायनाने झाली. राग ‘पुरिया कल्याण’ने त्यांनी सादरीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर ‘ज्ञानियांचा राजा’, ‘माझा भाव तुझे चरणी’ हे अभंग गायले. यानंतर प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी कथक नृत्य सादर केले. आपल्या सादरीकरणाची सुरुवात त्यांनी स्वरचित नृत्यवंदनेने केली. यानंतर ताल तीनतालमध्ये एकल नृत्य सादर केले. यात त्यांनी अभिनय रचना सादर केली. रामदास स्वामींची पत्नी लक्ष्मी हिचे भावबंध यातून त्यांनी मांडले.
तसेच एक लपछत कवितमध्ये त्रिपुरासुराची गोष्ट नृत्यातून मांडली. डॉ. चैतन्य कुंटे यांनी संगीतबद्ध केलेली पारंपरिक होरी सादर करून त्यांनी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता केली. त्यांच्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. जमेनीस यांना नृत्यसाथ मुग्धा डिसुजा, वैष्णवी देशपांडे आणि संगदेव केली. तसेच निखिल फाटक यांनी तबलासाथ व सुरंजन खंडाळकर यांनी संवादिनी व स्वरसाथ केली. उद्या (१९ फेब्रुवारी) महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अर्षद अली खान यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यानंतर पं. अतुलकुमार उपाध्याय यांचे व्हायोलीन वादन होईल.
